आरटीआय कार्यकर्ते बाळा वेंगुर्लेकर यांना धमक्या
मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक, आयुक्तांकडे तक्रार
मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक, आयुक्तांकडे तक्रार
मुंबई / अजेयकुमार जाधव / १९ सप्टेंबर २०१५
मुंबईच्या लालबाग येथील प्रसिद्ध असलेल्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचा अनागोंदी कारभार आणि कामात होणारा भ्रष्टाचार याबाबत सामाजिक व आरटीआय कार्यकर्ते महेश उर्फ बाळा वेंगुर्लेकर गेले कित्तेक वर्षे सातत्याने तक्रारी करून त्याचा पाठपुरावा करत आहेत. मंडळाचा भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार याविरोधात बाळा वेंगुर्लेकर यांनी सातत्याने तक्रारी करून त्याचा पाठपुरावा करत असल्याने यांना व त्यांच्या कुटुंबियांना गोळ्या घालून ठार करण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. याबाबत वेंगुर्लेकर यांनी मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त यांना पत्र देवून मंडळाच्या सुधीर साळवी व अशोक पवार यांच्या विरोधात लेखी तक्रार दिली आहे.
बाळा वेंगुर्लेकर यांनी गेले कित्तेक वर्षे मुंबई महानगर पालिका, धर्मादाय आयुक्त व इतर शासकीय कार्यालयातून आरटीआयच्या माध्यमातून लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळा विरोधात पुरावे व कागदपत्रे जमा करून या मंडळाच्या कामात कसा अनागोंदी कारभार सुरु आहे हे उघड केले होते. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने मुंबई महानगर पालिकेने रस्ते व पद पथावर मंडप उभारण्यासाठी पडलेल्या खड्डयासाठी गेल्या वर्षा पर्यंत २९ लाख रुपये दंड भरला नसल्याचे उघड केले होते. मंडळाकडे दान म्हणून येणाऱ्या रोख रक्कम आणि सोने असेच इतर वस्तूंची संख्या कमी दाखवून भ्रष्टाचार होत असल्याचा वेंगुर्लेकर यांचा आरोप आहे. या आरोपा बाबत वेंगुर्लेकर यांनी सत्याने राज्य सरकारमधील मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त, मुंबई महानगर पालिका तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाला पुराव्यासह पत्र दिली आहेत. परंतू सरकार, पोलिस, पालिका गणेशोत्सव मंडळाला आणि त्यांच्या पदाधिकाऱ्याना पाठीशी घालत आहे असे वेंगुर्लेकर यांनी सांगितले आहे.
१० सप्टेंबर पासून सातत्याने वेंगुर्लेकर यान गुंड प्रवृत्तीची लोकरस्त्यात गाठून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या संदर्भात देण्यात आलेल्या तक्रारी व आरटीआयचा पत्रव्यवहार बंद कर अन्यथा तुला व तुझ्या कुटुंबियांना गोळ्या घालून ठार मारू अशी धमकी देण्यात येत आहे. सातत्याने येणाऱ्या धमक्याबाबत वेंगुर्लेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस महासंचालक व मुंबई पोलिस आयुक्त यांना १८ सप्टेंबर रोजी पत्र देवून आपल्याला व कुटुंबियांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच आपल्याला व आपल्या कुटुंबियांचे काही बरे वाईट झाल्यास लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी व अध्यक्ष अशोक पवार यांना जबाबदार धरावे असे म्हटले आहे. दरम्यान याबाबत मंडळाचे सुधीर साळवी व अशोक पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते गणेशोत्सवाच्या कामात व्यस्थ असल्याने संपर्क होऊ शकलेला नाही.
वेंगुर्लेकर यांनी दिलेल्या तक्रारीची प्रत


