दुष्काळग्रस्तांसाठी आठवले मुख्यमंत्री निधीस दोन महिन्यांचे वेतन देणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दुष्काळग्रस्तांसाठी आठवले मुख्यमंत्री निधीस दोन महिन्यांचे वेतन देणार

Share This
मुंबई १५ सप्टेंबर २०१५ 
राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले हे वीस, एकवीस व बावीस तारखेला दुष्काळी दौऱ्यावर जाणार आहेत. बावीस तारखेला उस्मानाबाद येथे पक्षातर्फे दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत म्हणून आठवले आपला खासदारकीचे दोन महिन्यांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणार आहेत. सरकारने दुष्काळी परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी अभ्यासगटाची नियुक्ती करावी अशी मागणी त्यांनी केली. 

वांद्रे येथे पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. दुष्काळावर तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता आहे. जास्त पाऊस पडणाऱ्या  मुंबई व कोकणातील पाणी दुष्काळी प्रदेशांमध्ये वाहून नेण्याचा उपाय आठवलेंनी यावेळी सुचवला आहे. पाणी वाहून नेण्यासाठी आराखडा बनवण्याची मागणी आपण पंधरा वर्षांपासून करत आहोत मात्र केंद्र व राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे व कर्ज माफ करण्याबाबत सरकारने विचार करावा असे आवाहन त्यांनी केले.


कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरकारने सत्तेत असताना शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही मात्र आता विरोधकांच्या भूमिकेत ते मागणी करत आहेत, असा टोला त्य़ांनी लगावला.  राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दहा ते पंधरा हजार कोटी रुपयांची मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारने सिंचनाचे क्षेत्र वाढवले असते तर दुष्काळाशी चांगला सामना करता आला असता असे आठवले म्हणाले.

आठवले वीसला दौऱ्यावर जातील. सांगली, सातारा, सोलापूर, बीड, लातूर व उस्मानाबाद या सहा जिल्ह्यांचा ते दौरा करणार आहेत.  उद्योगपती, बॉलीवूड क्षेत्रातील व्यक्ती व सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनी व सर्वसामान्य नागरिकांनी दुष्काळग्रस्तांसाठी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीबाबत काहीही वावगे नाही. पवार हे देशातील ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांना पंतप्रधानांची भेट घेण्याचा अधिकार आहे, या भेटीकडे राजकीय नजरेने पाहण्याची गरज नाही असे आठवले यांनी स्पष्ट केले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages