अटींचे पालन करूनच उत्सव साजरा करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अटींचे पालन करूनच उत्सव साजरा करा

Share This
मुंबई : दहीहंडी व गणेशोत्सव साजरा करताना न्यायालयाने आखून दिलेल्या अटींचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश मंगळवारी पोलिसांनी उत्सव मंडळांच्या समन्वय समिती सदस्यांच्या बैठकीत दिले. आझाद मैदान येथील पोलीस क्लबमध्ये आयोजित पोलीस अधिकारी व समन्वय समितीच्या बैठकीत हे आदेश पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकार्‍यांना दिले. दहीहंडी उत्सवात १२ ते १५ वर्षांखालील मुलांवर न्यायालयाने बंदी घातली आहे. या बंदी आदेशाचे पालन न करणार्‍या गोविंदाविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी या वेळी दिले. ज्या गोविंदामध्ये १२ ते १५ वर्षांखालील मुलांचा सहभाग असेल, तर पोलिसांनी आयोजकांकडे त्यांच्या पाल्ल्याच्या सहमतीचे पत्र असल्याबाबतची खातरजमा करावी, असेही आदेश देण्यात आले आहेत. हे पत्र नसेल, तर त्या गोविंदाविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहीकाला व गणेशोत्सव शांततेने पार पडण्यासाठी काय उपाययोजना तसेच खबरदारी घेतली पाहिजे, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी ही बैठक आयुक्तांनी बोलावली होती. या बैठकीला दहीकाला-गणेशोत्सव समन्वय समितीचे अनेक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी व सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक, सहाय्यक आयुक्त व उपायुक्त हजर होते. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही बैठक दुपारी ३.३0 च्या सुमारास संपली. गणेशोत्सव साजरा करताना गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी पालिका व न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे तंतोतंत पालन करण्याचे आश्‍वासन समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांनी या बैठकीत दिले.

वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता अनेक मंडळांनी घेतला आहे. काही मंडळांनी मंडपाचा आकारही कमी केला आहे. बड्या मंडळांना गणपतीच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संशयित व्यक्तींवर पाळत ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात सर्व शहरभर पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे. पोलीस व मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी विशेष संदेशवहन यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. त्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांना ओळखपत्रे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कार्यकर्त्यांकडे काही पोलीस अधिकार्‍यांचे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. जेणेकरून एखादी संशयित व्यक्तीची माहिती तात्काळ पोलिसांना दिली जाऊ शकेल व त्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल. गणेशोत्सवाच्या काळात कार्यकर्ते व पोलीस यांना जागरूक राहण्यास सांगण्यात आले आहे. दहीकाला व गणेशोत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलिसांनी शहरभर जाळे पसरले आहे. मुंबई बाहेरून येणार्‍या सर्व संशयित गाड्यांची तपासणी करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages