१२५ कोटींच्या प्राथमिक खर्चास सरकारची मान्यता
मुंबई- २२- (प्रतिनिधी )
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे परदेश तसेच देशांतर्गत दौऱ्या मुळे लांबणीवर पडलेल्या भारतरत्न डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या इंदु मील येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे भूमिपूजन ४ ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या खर्चासाठी मंत्रिमंडळाने १२५ कोटी रुपयांच्या खर्चास आज मान्यता दिली .
इंदु मीलच्या जागेमध्ये डॉ आंबेडकरांचे स्मारक व्हावे यासाठी गेली काही वर्षे रिपब्लिकन पक्षाच्या विविध संघटना संघर्ष करत होते. बंद पडलेल्या इंदु मीलच्या बारा एकर जागेत भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक केले जाईल अशी आश्वासने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी तसेच भारतीय जनता पक्षानेही गेल्या निवडणुकांमध्ये दिली होती. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती, मात्र मोदी सरकारने इंदु मिलची जागा केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग महामंडळाकडून राज्य सरकाकडे सूपूर्द करण्यात आल्यानंतर राज्यातील फडणवीस सरकारने या जागेत आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाची घोषणा करीत आता येत्या ४ ऑक्टोंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. याचबरोबर नवीन मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे.
आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्याची माहिती दिली. इंदु मीलमधील कार्यक्रमा प्रमाणेच मेट्रो दोन व मेट्रो सात या दोन नवीन मेट्रे प्रकल्पांचेही भूमीपूजन मोदींच्या हस्ते कऱण्यात येत आहे. मेट्रो दोन हा प्रकल्प दहिसर पश्चिम ते डी एन नगर अंधेरी असा असून या प्रकल्पाचा सुमारे ४ हजार ९९४ कोटी रुपये खर्चाचा असून मेट्रो सात हा प्रकल्प दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व असा असून त्याचा खर्च ४ हजार ७३७ कोटी रुपये इतका आहे. इंदु मीलच्या जागेतील स्मारकासाठी अनेक प्रस्ताव सरकारकडे आले होते. त्यातील दोन प्रस्तावावर गांभिर्याने विचार सुरु होता. त्यातील शशी प्रभु यांनी तयार केलेला आराखडा मान्य कऱण्यात आला आहे. त्यामध्ये भव्य ग्रंथालय, विपश्यना सभागृह, भव्य पुतळा आदिंची योजना करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुरुवातीसाठी १२५ कोटी रुपयांच्या खर्चास आज मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. या दोन्ही महत्वपूर्ण प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांच्या जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी पार्क येथील इंदु मिलच्या जागेत भूमीपूजन होईल तर मेट्रोच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम गोरेगाव येथे केला जाणार आहे.
