मुंबई । अजेयकुमार जाधव
जैन समाजाच्या प्रयुषण पर्व कालात राज्य सरकारने 2 दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असताना पालिकेने मात्र 4 दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेण्यास भाजपाने फूस लावली असून हा निर्णय समाजामधे तेढ निर्माण करणारा असून भाजपा धर्मभेद पसरवत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन आहिर यांनी केला आहे.
पालिकेने 4 दिवस मांस विकण्यास बंदी घातली आहे. ही बंदी वाढवून 8 दिवस आणि 10 दिवस करण्याची मागणी भाजप सरकार मधील मंत्री आणि आमदार करत आहेत. याचा आम्ही निषेध करत असून हे परिपत्रक रद्द करावे म्हणून कोम्बडी आणि सुकी मच्छी उपमहापौर आणि प्रशासनाला देत आहोत अशी माहिती आहिर यांनी दिली. आमच्या या आंदोलनानंतरही पालिकेने परिपत्रक रद्द केले नाही तर रस्तावर उतरु असा इशारा आहिर यांनी दिला.
पालिकेने मांस बंदीचे परिपत्रक मागे घ्यावे म्हणून आमचे नगरसेवक आवाज उचलत राहतील. आमचे आंदोलन सतत सुरूच राहील असे सांगताना महापौरानी परिपत्रक रद्द करण्याचे निर्देश दिले आहे. महापौरांचे निर्देश प्रशासन पाळते का यावरून महापौरांचे वजन किती आणि पालिकेत सत्ता शिवसेनेची की भाजपाची हे कलेल असे आहिर म्हणाले. यावेळी गटनेते धनंजय पिसाळ, नगरसेविका राखी जाधव यांच्यासह मोठ्या प्रमाणात नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
