मुंबईच्या पाणीप्रश्नावर श्‍वेतपत्रिका काढण्याची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईच्या पाणीप्रश्नावर श्‍वेतपत्रिका काढण्याची मागणी

Share This
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावातील पाण्याचा साठा दिवसेंदिवस खालावत चालल्यामुळे येणार्‍या संकटाचा विचार करून पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी स्थायी समितीच्या सभेत सर्वच पक्षांच्या सदस्यांनी केली. घाटकोपर येथे तीन दिवस पाणी आला नसल्याबाबत प्रश्न उपस्थित करत पाणीप्रश्नावर श्‍वेतपत्रिका काढण्याची मागणी काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी केली. सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन, १५ सप्टेंबर रोजी समितीची विशेष सभा आयोजिण्याची घोषणा समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी या वेळी केली. मुंबईत बिकट होणार्‍या पाणी समस्येबद्दल सभेत सलग तीन तास चर्चा झाली. सर्वच सदस्यांनी त्यात भाग घेतला. 
सध्या १५ टक्के पाणीकपात होत असली तरी ती प्रत्यक्षात ५0 ते ६0 टक्के आहे तर पाणी दाबानेही मिळत नाही. पाणीपुरवठय़ाच्या वेळांमध्येही कपात झाल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे, अशी तक्रार सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कृत्रिम पावसासाठी पालिकेच्या काही योजना आहेत का? असा सवाल भाजपाचे सदस्य दिलीप पटेल यांनी केला आणि जलशुद्धीकरणासाठी काही योजना हाती घेण्याची सूचनाही त्यांनी केली. पाणीप्रश्न बिकट होण्याआधीच मुंबईतील सर्व बोअरिंग पालिकेने ताब्यात घ्यावीत, अशी मागणी नगरसेवकांनी केली. विकासक आजही बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरत आहेत तर तीन टक्के पाणीगळतीमध्ये वाया जात आहे, असेही सदस्य
म्हणाले.

२३५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सर्व जलाशयांमध्ये सध्या पुढील २३५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे आणि ३२५ दिवसांइतका पाणीसाठा मिळाल्यास जलाशय भरतील, अशी माहिती जल अभियंता तवाडिया यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages