कुलकर्णी यांच्या वरील शिवसेनेच्या शाईनं भाजप सरकारचा चेहरा पुरता काळा केला : धनंजय मुंडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 October 2015

कुलकर्णी यांच्या वरील शिवसेनेच्या शाईनं भाजप सरकारचा चेहरा पुरता काळा केला : धनंजय मुंडे


मुंबई, दि. 12  :-  पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजक श्री. सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शिवसेनेनं फेकलेल्या शाईनं राज्यातल्या भाजप सरकारचा चेहरा पुरता काळा केला असून सरकारला तोंड लपवायला जागा ठेवलेली नाही. राज्यातलं भाजपचं सरकार केवळ मंत्रालयापुरतं मर्यादित असून राज्यातल्या रस्त्यांवर होणारी ही झुंडशाही मुख्यमंत्री रोखतील, असं आम्हाला वाटत नाही आणि तशी अपेक्षाही नाही, अशी बोचरी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.


भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांची राज्यात संयुक्त सत्ता आहे. परंतु गुंडशाही, झुंडशाही करण्यात हेच सत्तारुढ पक्ष आघाडीवर आहेत. मुंबईतील गुलाम अलींचा कार्यक्रम शिवसेनेमुळे आधीच रद्द झाला आहे. सरकारच्या विचारधारेशी सुसंगत नसणारा प्रत्येक विचार दाबण्याता येत आहे. पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल आता तालीबानी राजवटीच्या दिशेनं होतेय की काय अशी भीती जनतेच्या मनात आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार ही गुंडशाही रोखण्यास असमर्थ असल्याचं सिद्ध झालं आहे, सर्वात क्लेशदायक आणि निराशाजनक आहे, असे मुंडे यांनी सांगितले.

मुंडे पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेनेची सर्व आघाड्यांवर कोंडी केली आहे. शिवसेनेचा अपमान, अवहेलना करण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. मंत्रालयात बसणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांना ना महत्वाची खाती, ना कुठले अधिकार अशी परिस्थिती आहे. भाजपकडून शिवसेनेचं खच्चीकरण होत असल्याचा राग, शिवसेना अशा पद्धतीनं रस्त्यावर सर्वसामान्य माणसांवर काढण्यात धन्यता मानत आहे. खासदार संजय राऊत यांनी तर ही किरकोळ प्रतिक्रिया आहे, अशी धमकी दिली आहे. त्यामुळे पुढची प्रतिक्रिया ही कुणाचा तरी बळी जाण्यात होऊ शकते. त्यामुळे पुरोगामी विचारांचे लोकप्रतिनिधी आणि प्रसिद्धी माध्यमांनीच आता जनमत तयार करण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही मुंडे यांनी व्यक्त केली.

Post Bottom Ad

JPN NEWS