महापालिकेच्या कांजूरमार्ग येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातून गॅस निर्मितीस सुरूवात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिकेच्या कांजूरमार्ग येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातून गॅस निर्मितीस सुरूवात

Share This

बायोरिऍक्टर तंत्रज्ञानाचा वापर करुन कच-यावर प्रक्रिया करणारा देशातील पहिला प्रकल्प
मुंबई / प्रतिनिधी / 7 Oct 2015
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे महापालिका क्षेत्रातून दररोज निर्माण होणा-या ९,५०० मे.टन कच-याचे व्यवस्थापन केले जाते. यापैकी ३००० मे.टन कचरा कांजूरमार्ग येथील प्रकल्पात वाहून नेण्यात येत आहे. दि.६ मार्च, २०१५ पासून हा प्रकल्प सुरु झाला आहे. बायोरिऍक्टर तंत्रज्ञानाच्या आधारे व प्राणवायू विरहित (अनॉरोबिक / Anerobic) पद्धतीने प्रक्रिया करणारा हा देशातील पहिला प्रकल्प आहे. या प्रकाल्पातून आता गॅस निर्मिती सुरु झाली आहे. या प्रकल्पाचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे या प्रकल्पामुळे जवळपासच्या परिसरात दुर्गंध पसरण्यावर नियंत्रण शक्य होण्याबरोबरच प्रकल्पात येणा-या कच-यावर पर्यावरण सुसंगत पद्धतीने प्रक्रिया करण्यात येत आहे. 


या प्रकल्पास केंद्र व राज्य शासनाच्या सर्व संबंधित प्राधिकरणांनी मंजूरी दिली आहे. या प्रकल्पावर संबंधित सर्व प्राधिकरणांची नियमित देखरेख आहे. तसेच प्रकल्पाचे कामकाज शास्त्रोक्त पध्दतीने व पर्यावरण दृष्ट्या सुसंगत व्हावे याची खातरजमा करण्यासाठी व आवश्यकता भासल्यास योग्य ती उपाययोजना सुचविण्यासाठी महापालिकेने ‘निरी’ या राष्ट्रीय स्तरावरच्या संस्थेची नेमणूक केली आहे.  त्याचबरोबर अशा प्रकारचा प्रकल्प भारतात सर्वप्रथम राबविण्यात येत असल्यामुळे या प्रकल्पाच्या तांत्रिक बाबींसाठी ‘आयआयटी, मुंबई’ या संस्थेची प्रचालकातर्फे मदत घेतली जात आहे. एकूण १४१.७७ हेक्टर इतकी जागा  प्रकल्पासाठी उपलब्ध असली तरी देखील यापैकी ५२.४५ हेक्टर सीआरझेड – III अंतर्गत येणारी असून २३.३६ हेक्टर इतकी जागा कांदळवनाची अर्थात मँग्रुव्हज् ची आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रकल्प विकासाकरिता ६५.९६ हेक्टर इतकी जागा उपलब्ध झाली आहे. या जागेवर ७ बायोरिऍक्टर सेल उभारण्याचे प्रस्तावित आहे. यापैकी पहिला बायोरिऍक्टर सेल कार्यान्वित झाला असून दुस-या बायोरिऍक्टर सेलच्या निर्मितीचे काम सध्या प्राथमिक टप्प्यात आहे.

पहिल्या बायोरिऍक्टर सेलची क्षमता सुमारे १२,००,००० मे. टन इतका कचरा सामावून घेण्याची आहे. दररोज सुमारे ३,००० मे.टन कचरा यामध्ये टाकल्यास सुमारे ४०० दिवसांनी हा सेल पूर्ण भरणे अपेक्षित आहे. त्यानंतर दुस-या बायेरिऍक्टर सेलमध्ये कचरा टाकण्यास सुरुवात होईल. याप्रकारे सर्व सेल सुमारे ७ वर्षांच्या कालावधीत अनुक्रमानुसार वापरण्यात येतील. प्रत्येक बायोरिऍक्टर सेल ५ ते ७ वर्षांनी रिकामे करण्यात येऊन पुन्हा वापरात येतील, ही बाब लक्षात घेतल्यास एका पाठोपाठ एक बायोरिऍक्टर वापरण्याचे चक्र अव्याहतपणे सुरु असेल. ज्यामुळे उपलब्ध जागेचा अत्यंत परिणामकारक वापर करणे शक्य होणार आहे. कचरा व कच-यातून प्राप्त होणारे दुर्गंध युक्त पाणी (लिचेट /Leachate) या दोन्हींवर नियमित स्वरुपात ‘बायोविश’ (BIO-WISH) ह्या जीवाणू आधारीत भूकटीचे द्रावण फवारले व मिसळले जात आहे. ज्यामुळे कच-याचे विघटन लवकर होण्यास तसेच दुर्गंधीवर नियंत्रण मिळवणे शक्य होत आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages