मुस्लिम समाजातील व्यक्तींना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न - अबू आझमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 October 2015

मुस्लिम समाजातील व्यक्तींना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न - अबू आझमी

मुंबई / प्रतिनिधी / 6 Oct 2015 - मुस्लिम समाजातील व्यक्तींना दहशतवादी ठरवण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्न करत आहेत. निर्दोष व्यक्तींना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचे प्रकार बंद करण्याची गरज आहे; अन्यथा समाजात तणाव पसरू शकतो अशी भीती समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात मंगळवारी मिल्ली तेहरिक संघटनेच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. मालेगाव आणि इतर स्फोटांच्या प्रकरणी अटक केलेल्या हिंदू दहशतवाद्यांना वेगळा न्याय दिला जातो, असा आरोप आझमी यांनी केला. निर्दोष व्यक्तींना न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे, असेही आझमी म्हणाले.
सदर कार्यक्रमात गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावरील हल्लाप्रकरणी निर्दोष सुटलेले मुफ्ती अब्दुल कय्यूम, मुंबईतील रेल्वे बॉम्बस्फोटप्रकरणी निर्दोष सुटलेले अब्दुल वाहिद यांनी आपले अनुभव कथन केले. ‘मला 11 वर्षे खोट्या आरोपांमुळे तुरुंगात खितपत पडावे लागले. गुन्हा कबूल करण्यासाठी माझा अमानुष छळ करण्यात आला. पोलिसांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून मी मृत्यूसाठी प्रार्थना करत होतो. सत्र न्यायालयाने मला फाशीची शिक्षा दिली. गुजरात उच्च न्यायालयाने सहा महिन्यांनंतर ती शिक्षा कायम केली; मात्र सर्वोच्च न्यायालयाने साक्षीपुरावे तपासून मला निर्दोष मुक्त केले असे मुफ्ती अब्दुल यांनी सांगितले. अशा प्रकारे मुस्लिम तरुणांना खोट्या गुन्ह्यांत फसवण्याचे प्रकार थांबायला हवेत; अन्यथा गंभीर परिस्थिती निर्माण होईल अशी भीती मुफ्ती अब्दुल यांनी व्यक्त केली. ‘दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कथा रचून आम्हाला ताब्यात घेतले. न्यायालयाने दोषी ठरवलेले सर्व 12 जण निर्दोष आहेत. एटीएस अधिकारी तासन्‌ तास आरोपींचा छळ करायचे आणि त्यानंतर जबरदस्तीने कबुलीजबाब लिहून घ्यायचे. हे कबुलीजबाब पुरावा मानून न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली आहे; मात्र उच्च न्यायालयात ते निर्दोष ठरतील असा विश्वास अब्दुल वाहिद यांनी व्यक्त केला. 

Post Bottom Ad

JPN NEWS