बाबासाहेब नसते तर मी पण प्रधानमंत्री नसतो - नरेंद्र मोदी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 October 2015

बाबासाहेब नसते तर मी पण प्रधानमंत्री नसतो - नरेंद्र मोदी

स्मारकाच्या भूमिपूजनाची संधी मिळाली हे माझे भाग्य  
प्रधानमंत्री चैत्यभूमीत नतमस्तक 
मुंबई / अजेयकुमार जाधव 
शिका, संघटित व्‍हा आणि संघर्ष करा असे शिकवणा-या डॉ. आंबेडकरांनी दिलेली ताकद कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. बाबासाहेब नसते, तर मी पण नसतो. म्‍हणून बाबासाहेबांच्‍या विचारांचा जगभर प्रसार व्‍हावा. त्‍यांचे स्‍मारक हे शांतीचे ठिकाण झाले पाहिजे. असे मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या व मेट्रोच्या भूमीपुजनानंतर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जाहीर सभेत प्रधानमंत्री बोलत होते.


यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना मोदी यांनी जयप्रकाश नारायण यांची आठवण करून दिली. आणिबाणीच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचे रक्षण करण्याचे काम जयप्रकाश नारायण यांनी केले. जयप्रकाश नारायण यांनी आणिबाणीच्या काळात आणीबाणी विरोधात लढा दिला. संविधानाचे रक्षण केले. अश्या जयप्रकाश नारायण यांची आज जयंती असून याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो असे उद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना फक्त दलितांचे नेते ठरवले तर हा त्यांचा अवमान आहे. आंबेडकर हे एका समाजासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेत असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. 


आज जगाला मार्टिन लूथरकिंग माहित आहेत पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी जगाला माहित नाही हे आपलेच दुर्दैव आहे. बाबासाहेब अत्यंत कठीण स्थितीतून पुढे आले पण त्यांच्यात कटुता कधीही नव्हती असे मोदींनी सांगितले. कोणाला कधी भारतरत्न मिळाले हे सर्वांनाच माहिती आहे, पण त्यांनी बाबासाहेबांना भारतरत्न दिला नाही, ज्यांनी संविधान तयार केले अशा आंबेडकर यांचे तैलचित्र संसदेत लावण्यास तत्कालिन सरकार तयार नव्हते असे सूचक विधान करत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. इंदू मिलमधील आंबेडकर यांच्या स्मारकासाठी लोकसहभाग असायला हवा. महाराष्ट्रात ४० हजार गाव आहेत, या प्रत्येक गावाने स्मारकाच्या परिसरात एक रोपटं लावावे आणि ११ हजार रुपये द्यावे असे आवाहन मोदींनी केले आहे. यामुळे स्मारकाचे चित्रच बदलेल असे मोदी यांनी सांगितले.

मोदी यांनी सभेमध्ये विविध विषयांना स्‍पर्ष केला. विकासासाठी रस्‍ते, जल व हवाई वाहतूक महत्‍त्वाची आहे. त्‍यादृष्‍टीने मेट्रोची गरज ओळखून या प्रकल्‍पाचा व्‍याप वाढवण्‍यासाठी प्रयत्‍न होत असल्याचे मोदी यांनी सांगितले. मोदी यांनी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या जलयुक्‍त शिवार योजनेचे कौतूक केले. महाराष्‍ट्रातील शेतक-यांना पावसाच्‍या पाण्‍यावर अवलंबून राहावे लागते असा उल्लेख करत ही योजना प्रभावी असल्‍याचे मोदी म्‍हणाले.देशात भाजपाची सत्ता आली की आरक्षणाविरोधात भीती पसरवली जाते. भाजपा आली म्हणजे आरक्षण जाणार अशी भीती समाजाला दाखवली जाते. ही खोटी माहिती पसरवून राजकारण करण्याचे उद्योग बंद झाले पाहिजे असे मोदींनी विरोधकांना सुनावले आहे.

डॉ. आंबेडकर यांना आपण दूरदृष्टीच्या अभावी केवळ दलितांचे नेते बनवले तर तो त्यांच्यावर अन्याय ठरेल, अशा शब्दात मोदींनी आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले की, डॉ. आंबेडकर हे विश्वातील दलित, शोषित, पिडीतांचे नेते आहेत. शोषितांच्या संघर्षाचा विषय निघाला की, मार्टीन ल्युथर किंग यांचे नाव घेतले जाते. त्याचप्रमाणे डॉ. आंबेडकर यांचे नाव जगभर घेतले गेले पाहिजे. डॉ. आंबेडकर यांनी आयुष्यभर उपेक्षेचे विष पचवले. मात्र जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी कधीच कुटुतेचे दर्शन घडवले नाही. त्यामुळे त्यांचे विचार जगभर पोहोचविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही मोदींनी दिली.

चैत्यभूमीत बाबासाहेबापुढे मोदी नतमस्तक 
इंदू मिल मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी आलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चैत्यभूमीमध्ये बाबासाहेबांपुढे नतमस्तक झाले. त्यानंतर मोदी यांनी इंदू मिल मधील बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. याप्रसंगी प्रधानमंत्र्यांसोबत 
राज्यपाल चे.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रस्ते, परिवहन आणि राजमार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार रामदास आठवले, माजी राज्यमंत्री सुलेखाताई कुंभारे, मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता आदी उपस्थित होते. 
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची डाक तिकिटे प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.

Post Bottom Ad

JPN NEWS