स्मारकाच्या निमित्ताने भाजपा, मोदींची परिक्षा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

स्मारकाच्या निमित्ताने भाजपा, मोदींची परिक्षा

Share This

तमाम बौद्ध धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर इंदू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कोनशिला समारंभ रविवारी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे. भारतासाठी राज्य घटना बनवणाऱ्या महान अश्या व्यक्तीचे स्मारक बनवण्यासाठी तब्बल १० वर्षे लढा दिल्या नंतर इंदू मिल मधील स्मारकाचे भूमिपूजन झाले आहे. आपल्या भारत देशाची राज्य घटना बनवणाऱ्या बाबासाहेबांसारख्या महान व्यक्तीच्या स्मारकाचा कोनशिला समारंभ (भूमिपूजन) करण्यासाठी प्रधानमंत्री आले. याचा सर्वत्र उदो उदो केला जात असला तरी याचे नेमके खरे कारण काय हे समजून घेतले पाहिजे. 

मिळालेल्या माहितीनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कोनशिला समारंभाचे कारण देत देशाचे प्रधानमंत्री चैत्यभूमीला ४० वर्षानंतर भेट देत आहेत. या चाळीस वर्षात एकही प्रधानमंत्र्याला देशासाठी राज्य घटना बनवणाऱ्या बाबासाहेबांचे स्मारक असलेल्या चैत्यभूमिला भेट द्यावी असे वाटलेले नाही. या चाळीस वर्षात काँग्रेस, भाजपा व इतर पक्षाचे प्रधानमंत्री होऊन गेले आहेत. मग आताच का ? असा प्रश्न प्रत्तेक आंबेडकरी जनतेला पडलेला आहे. प्रधानमंत्र्यांच्या भेटीला कारणहितासेच आहे. बिहारच्या निवडणुका होत आहेत. बिहार, उत्तर प्रदेश या राज्यातील मागासवर्गीय जनतेला दाखवण्यासाठी हे नियोजन केले आहे. 

सप्टेंबर २००३ पासून चंद्रकांत भीवा भंडारे हे इंदू मिल मधील जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी राखीव ठेवावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. याला जोड म्हणून विजय कांबळे यांचे मुठ भर मातीचे आंदोलन आणि ६ डिसेंबर २०११ रोजी बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी आंबेडकरी जनतेमधील गटतट विसरून इंदू मिल ताब्यात घेण्याचे केलेले आंदोलन यामुळे सरकारने इंदू मिलची जागा बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला. सन २०१३ मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने विधानसभेत तसा ठराव मंजूर करून घेतला. 

परंतू नंतर केंद्र आणि राज्यातील सरकार बदलले. मोठमोठ्या घोषणा करत भाजपाचे सरकार सत्तेवर आले. सरकारला आपल्या कार्यकाळात म्हणावे करता आलेले नाही. महागाई आहे तशीच आहे. युवक युवतींना नोकऱ्या मिळणे बंद झाले आहे. सरकारी कार्यालयातील नोकऱ्या मिळण्याची शक्यता संपली आहे. परदेशातील काळे धन परत आलेले नाही. सन २०२५ मध्ये संपूर्ण हिंदू राष्ट्रची संकल्पना भाजपाला पृर्ण करायची आहे. त्यासाठी सरकारला काहीही करून विविध राज्यातील सत्ता काबीज करायची आहे. २०१६ - १७ मध्ये भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेचीही निवडणूक होत आहे. अश्या ठिकाणी भाजपाला सत्ता मिळवायची आहे. 

सरकारला आपण दिलेली आश्वासने पुरण करू शकलो नसल्याने सरकार फेल ठरले आहे याची जाणीव भाजपाला आहे. परंतू जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी बिहार व इतर राज्यामधील तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांची मते मिळवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले गेले आहे. केंद्र सरकारने अद्याप हि जमीन राज्य सरकारच्या ताब्यात दिलेली नाही. या जमिनीच्या बदल्यात राज्य सरकार केंद्राला ९७० कोटी तुपये देण्यास तयार आहे. तर केंद्र सरकार १३०० कोटी रुपये टिडीआर म्हणून मागत आहे. राज्य आणि केंद्र सरकारमध्ये याबात स्मारकाचे भूमिपूजन झाले तरीही अद्याप एकमत झालेले नाही. यावरून भाजपाला बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाची किती घाई झाली आहे दिसते. 

इंदू मिल मधील जमीन अद्याप सरकारच्या ताब्यात आलेली नाही. जमीन ताब्यात आली नसतानाच राज्य सरकारने स्मारकाचे संकल्प चित्र ज्या शशी प्रभू यांच्याकडून बनवून घेतले आहे. त्या संकल्प चित्राला आंबेडकरी जनता आणि संघटनाकडून विरोध केला जात आहे. चैत्यभूमीचा विकास तीन ते चार टप्प्यात होणार होता. चैत्यभूमीच्या विकास कामात इतर कामे झाली परंतू चैत्यभूमी आहे तशीच आहे. मुंबई महानगरपालिकेने शशी प्रभू यांच्या कामावर ठपका ठेवला होता. यामुळे त्यांच्याकडून चैत्यभूमेचे काम काढून घेण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपाचे सरकार आहे हे विशेष. 

शशी प्रभू यांनाच आता इंदू मिलमधील स्मारकाचे काम देण्यात आले आहे. ४५० कोटी रुपये खर्चून येत्या तीन वर्षात बाबासाहेबांचे स्मारक उभे राहील अश्या घोषणा केल्या जात आहेत. चैत्यभूमीमधील कामाचा शशी प्रभू यांच्या कामकाजाचा अनुभव बघता बाबासाहेबांचे स्मारक तीन वर्षात उभे राहील का याबाबत शंका आहे. आंबेडकरी नेत्यांनीही स्मारकात काय असावे काय असू नये, बाबासाहेबांचा पुतळा किती मोठा असावा यावरून वाद निर्माण केला आहे. यामुळेही स्मारकाचे काम पूर्ण होण्यास उशीरच होणार आहे हे नक्की. 

बाबासाहेबांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने मागासवर्गीय बौद्ध जनते बरोबरच भारतातील लोकांचे लक्ष इतर महत्वाच्या गोष्टींकडून वळवण्यात आणि बिहारमधील मागासवर्गीयांची मते आपल्या पक्षाकडे वळवण्याचा प्रयत्न करण्यात भाजपा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या तरी यशस्वी झाले आहेत असेच म्हणावे लागेल. परंतू बिहारमधील मतमोजणीचे जेव्हा निकाल लागेल त्यावेळच्या निकालानंतरच भाजपा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकांचे लक्ष वळवण्यात किती यशस्वी ठरले आहेत हे दिसेल.   

अजेयकुमार जाधव (मो. ९९६९१९१३६३)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages