सरकारने आश्‍वासनांची पूर्तता न केल्याने निवासी डॉक्‍टर संपावर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सरकारने आश्‍वासनांची पूर्तता न केल्याने निवासी डॉक्‍टर संपावर

Share This

मुंबई - राज्य सरकारने दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता न केल्याने राज्यातील 14 वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्‍टर बुधवारी (ता. 25) रात्रीपासून संपावर गेल्याने संपूर्ण राज्यभरातील रुग्णांचे आतोनात हाल होणार आहेत; मात्र वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांबरोबर उद्या (ता. 26) सकारात्मक चर्चा झाल्यास हा संप मागे घेण्यात येणार असल्याची माहिती सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी दिली. संपाच्या काळात रुग्ण सेवेवर परिणाम होऊ नये यासाठी आपत्कालीन यंत्रणा सुरू ठेवण्यात येणार असली तरी बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या लाखो रुग्णांचे हाल होणार आहेत. 
नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता आणि न्यायवैद्यक शास्त्र विभागप्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांच्याकडून जाच होत असल्याच्या तक्रारी रुग्णालयातील निवासी डॉक्‍टरांनी यापूर्वी केल्या आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयातील एका डॉक्‍टरने केलेला आत्महत्येचा प्रयत्न; तसेच डॉक्‍टर महिलेचा लैंगिक छळ झाल्याचा आरोपही डॉ. व्यवहारे यांच्यावर आहे. याबाबत तक्रारी करूनही त्यावर कोणत्याही स्वरूपाची गंभीर दखल घेण्यात न आल्याने निवासी डॉक्‍टरांमध्ये नाराजी आहे. यासोबतच यापूर्वी राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने मान्य केलेल्या सहा मागण्या अद्यापही पूर्ण न केल्याने संप करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र रुग्णांचे हाल होऊ नयेत, याकरिता बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवण्याचा निर्णय ठेवण्यात येणार असल्याचे डॉ. मुंदडा यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याबरोबर गुरुवारी (ता. 26) मार्डच्या प्रतिनिधींची चर्चा होणार आहे. ही चर्चा सकारात्मक झाल्यास संप मागे घेण्यात येईल; अन्यथा राज्यभरातील 4500 निवासी डॉक्‍टर बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती सेंट्रल मार्डने दिली आहे.

मार्डच्या मागण्या 
विद्यावेतनात पाच हजार रुपयांची वाढ करणे
क्षय झालेल्या आणि गर्भवती डॉक्‍टरांसाठी सुटी मंजुरी
सुरक्षेत वाढ करण्याच्या आश्‍वासनाची अंमलबजावणी करणे
ओबीसी, एससी फ्रीशीपसंदर्भात निर्णय घ्यावा
विभागीय फेलोशिपच्या निर्णयावर कारवाई करावी
वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरणे
नागपूर महाविद्यालयातील डॉ. व्यवहारे यांच्यावर कारवाई करणे 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages