मुक्त विद्यापीठाच्या पुरवणी परीक्षा २४ नोव्हेंबर पासून - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुक्त विद्यापीठाच्या पुरवणी परीक्षा २४ नोव्हेंबर पासून

Share This


परीक्षा आयोजनात हायटेक तंत्रज्ञान वापरणारे राज्यातील पहिले विद्यापीठ   
नाशिक :  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या पुरवणी परीक्षा  २४ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. या परीक्षेपासून मुक्त विद्यापीठाने परीक्षा पद्धतीत अमुलाग्र बदल केले असून परीक्षा आयोजन, मूल्यमापन आणि निकाल प्रक्रिया यामध्ये अत्याधुनिक संगणकीय प्रणालींव्दारे कमी मनुष्यबळ वापरून परीक्षेचे निकाल अचूक आणि कमीत कमी वेळेत जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अशा पद्धतीने परीक्षा घेणारे हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरणार आहे.



विद्यापीठाद्वारे यावर्षी प्रथमच ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया आणि परीक्षा आयोजन प्रक्रिया राबविण्यात येत असून राज्यातील ६ लाख ८४ हजार ६२६ विद्यार्थ्यांनी हे नवे बदल आत्मसात करून विद्यापीठात प्रवेश घेतले आहेत. याशिवाय काही शिक्षणक्रमांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या आहेत. विद्यापीठाच्या ८ विभागीय केंद्रांतर्गत ५६ शिक्षणक्रमांच्या होणाऱ्या या पुरवणी परीक्षेसाठी राज्यातील ५७ परीक्षा केंद्रांवर ६२ हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून पुरवणी परीक्षा देणार आहेत. परीक्षाविषयक सर्व आवश्यक सेवा आणि माहिती  विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुविधांचा वापर करावा असे आवाहन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले आहे.



दरम्यान, आता विद्यापीठ प्रशासनाने आणखी एक पाऊल पुढे टाकत डिजीटायझेशन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध व काटेकोर पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा प्रवेशपत्रे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून परीक्षार्थींना कोणत्याही सबबीवर परीक्षा हॉलमध्ये प्रवेशपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. या नव्या बदलांमुळे सर्व परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करणे शक्य होणार आहे.

या परीक्षेसाठी पुरविण्यात येणाऱ्या उत्तरपुस्तिकेवर परीक्षार्थीची परीक्षेसंदर्भातील माहिती प्रिंट करून दिली जाणार आहेत. याशिवाय उत्तर पुस्तिकांचे मूल्यमापनसुद्धा ऑनस्क्रीन, ऑनलाईन पद्धतीने होणार असून मार्कस, डेटाएन्ट्रीसारखी विविध कामे कमी होणार आहे. यापुढील काळात सर्व परीक्षांमधील प्रश्नपत्रिका वाटप तसेच उत्तरपुस्तिका तपासणी हि सर्व कामे आधुनिक संगणकीय प्रणालींचा वापर करून होणार असल्याने अत्यंत पारदर्शी पद्धतीने परीक्षा होणार असल्याचे       परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी सांगितले. नियोजित परीक्षा केंद्राची माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी, आपल्या अभ्यासकेंद्राशी अथवा संकेतस्थळावर संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages