अपंगांच्या शाळांमध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी संस्थेऐवजी आता जिल्हा एकक ग्राह्य धरणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अपंगांच्या शाळांमध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी संस्थेऐवजी आता जिल्हा एकक ग्राह्य धरणार

Share This
मुंबई / प्रतिनिधी - स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अपंगांच्या अनुदानित किंवा विनाअनुदानित तत्त्वावरील शाळा तसेच कर्मशाळेमध्ये अनुकंपा तत्त्वावर कर्मचारी नियुक्त करताना संबंधित संस्थेतच नोकरी मिळण्याऐवजी आता जिल्ह्यातील कोणत्याही संस्थेच्या अपंगांच्या शाळेत नोकरी मिळणे शक्य झाले आहे. त्यासाठी संस्था या एककाऐवजी (युनिट) आता जिल्हा हे एकक ग्राह्य धरण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना लवकर नोकरी मिळणे शक्य झाले आहे.

या संस्थेतील कार्यरत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देताना पूर्वी संस्था हे एकक मानले जात होते. त्यामुळे संस्थेतील कर्मचारी मयत झाल्यास त्याच्या कुटुंबियांना त्याच संस्थेत अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी लागत होती. त्यामुळे मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना नोकरीसाठी प्रदीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागत होती. आजच्या निर्णयानुसार जिल्हा हे एकक गृहित धरल्यामुळे संबंधित जिल्ह्यातील कोणत्याही अपंगांच्या संस्थेमध्ये पद रिक्त झाल्यास मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एका पात्र व्यक्तीस त्या पदावर नियुक्ती देता येणार आहे. प्रथम अर्ज करणाऱ्या व्यक्तीस प्रथम प्राधान्य या तत्त्वावर पात्र ठरणाऱ्या कुटुंबियांची अनुदानित आणि विनाअनुदानित संस्थानिहाय दोन स्वतंत्र प्रतीक्षा याद्या जिल्हा स्तरावर ठेवण्यात येतील. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत अनुदानित आणि विना अनुदानित शाळेमधील मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना अनुक्रमे अनुदानित आणि विनाअनुदानित शाळेवर नियुक्ती देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages