- दक्षिण मुंबईतील 1381 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण
- मुंबईला स्मार्ट आणि सुरक्षित शहर बनविणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दक्षिण मुंबईतील अति महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या 1381 सीसीटीव्ही यंत्रणेच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उद्योगमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) प्रा. राम शिंदे, महापौर स्नेहल आंबेकर, आमदार राज पुरोहित, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी, पोलीस महासंचालक प्रवीण दिक्षीत, पोलीस आयुक्त जावेद अहमद आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करुन जनतेला अधिकाधिक सेवा देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण अधिक कार्यक्षम पोलिसिंग करु शकतो, यासाठी सीसीटीव्ही प्रकल्प हा महत्वाचा टप्पा आहे. शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांना पायबंद घालणे, गुन्ह्यांचा तातडीने तपास करणे, मुंबईची सुरक्षा अधिक भक्कम करणे, शहरातील वाहतुकीचे नियंत्रण करुन या शहराची कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.
सीसीटीव्हीमुळे शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांना पायबंद घालून त्याचा तातडीने तपास होण्यास मदत होऊन पोलिसांची कार्यक्षमता व पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारचा सीसीटीएनएस हा प्रकल्प सर्वात अगोदर महाराष्ट्राने स्वीकारला असून गेल्या 6 महिन्यात राज्यातील सर्व पोलीस ठाणी संगणक प्रणालीने जोडण्यात आली आहेत. कमांड आणि कंट्रोल सिस्टीमच्या माध्यमातून मुंबईला सुरक्षित शहर बनविण्यास प्राधान्य देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लवकरच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सीसीटीव्हीचे भक्कम नेटवर्क उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
देसाई म्हणाले, सीसीटीव्हीच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे मुंबई पोलिसांची जबाबदारी अधिक वाढली असून यापुढे या यंत्रणेतील सर्वांनी दक्ष राहून मुंबईला अधिक सक्षम करावे. सीसीटीव्ही प्रकल्प पूर्ण होण्यासाठी शासन प्रयत्नशील असताना यंत्रणेने हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी वेळेचे बंधन पाळण्याबरोबरच प्रकल्पाची किंमत वाढणार नाही याची दक्षता घ्यावी. या प्रकल्पामुळे मुंबई जागतिक दर्जाचे आर्थिक शहर बनण्यास मदत होणार असल्याचे मुख्य सचिव क्षत्रिय म्हणाले.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 1200 कॅमेरे लावण्याचे उद्दिष्ट असताना सोमवारी दक्षिण मुंबईत 1381 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालय, गिरगाव चौपाटी आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे मागणीनुसार कॅमेरे वाढविण्यात आले असून हा प्रकल्प पूर्ण होण्याची मुदत ऑक्टोबर 2016 असली तरी पावसाळ्यापूर्वीच हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मनोदय बक्षी यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी एलॲन्डटी कंपनीतर्फे तयार केलेली मुंबई शहरात लावण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही स्थळांची माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी एलॲन्डटीचे आर. श्रीनिवासन यांचा आणि सीसीटीव्हीची ठिकाणे निश्चित करण्यासाठी मदत केल्याबद्दल माजी पोलीस सहआयुक्त वसंत ढोबळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक पोलीस आयुक्त जावेद अहमद यांनी केले तर आभार सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंह यांनी मानले.
No comments:
Post a Comment