Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

कामगार मंत्र्यांच्या मतदारसंघात हजारो बांधकाम कामगार नोंदणीपासून वंचित

मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 22 Dec 2015   
राज्याचे कामगार मंत्री प्रकाश मेहता यांचा मतदार संघ असलेल्या घाटकोपर परिसरात रोज मोलमजुरीसाठी नाक्या-नाक्यांवर जाऊन उभे राहणाऱ्या हजारो बांधकाम, नाका, लोडिंग-अनलोडिंग, रंग आदी कामगारांची अद्यापही कोणतीच नोंदणी झाली नसल्याने हे कामगार सरकारच्या सर्वच योजना आणि सोयी-सुविधांपासून कोसो दूर राहिल्याचे समोर आले आहे.


असंघटीत क्षेत्रातील बांधकाम आणि नाका कामगारांच्या नोंदणीसाठी कायद्यात तरतूद असतानाही कामगारमंत्र्यांच्या विधानसभा क्षेत्रात एकही बिल्डर आणि कंत्राटदार नाका आणि बांधकाम कामगारांची नोंदणीच ठेवत नसल्याचे येथे असलेल्या राजावाडी, सर्वोदय, घाटकोपर स्थानकासमोरील नाक्यांवर उभे राहणाऱ्या नाका कामगारांकडून मंगळवारी सांगण्यात आले. बंजारा नाका कामगार संघटनेकडून सुरू करण्यात आलेले राज्यव्यापी जनजागृती अभियानादरम्यान मंगळवारी घाटकोपर येथील राजावाडी नाक्यांवरील कामगारांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न संघटनेचे अध्यक्ष ॲड. नरेश राठोड यांनी जाणून घेतले. यावेळी सरकारकडून नोंदणीची ठेवण्यात आलेली अट जाचक ठरत असल्याने आणि त्यासाठीची माहिती बांधकाम व्यावसायिकांकडून दडपून टाकण्यात येत असल्याने कोठेही नाका कामगारांची नोंद होत नसल्याची प्रतिक्रिया यावेळी साहेबराव खरेवाड, संभाजी आंबेकर, अंकुश जाधव, संभाजी आंबेकर या नाका कामगारांनी दिली. तर अनेकदा मागील वर्षभरापासून काही गुत्तेदार आपल्याला ठरलेली मजूरी सांगूनही सायंकाळी देत नाहीत. अनेकदा दमदाटी करून आमची मजुरीही कमी देत असल्याची प्रतिक्रिया नाका कामगारांकडून देण्यात आल्या. राजावाडी नाक्यावर रोज सुमारे दोन हजारांच्या दरम्यान नाका, बांधकाम कामगार मोलमजुरीसाठी येऊन उभे राहातात. यात राज्यातील मराठवाडा, विदर्भासह आंध्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आदी अनेक राज्यातील कामगारांचा समावेश आहे.  मात्र यातील एकाही कामगाराची आत्तापर्यंत सरकारच्या आणि कोणत्याही संस्थेच्या माध्यमातून नोंदणी करून त्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळाला नसून  यासाठी आम्हाला कोणी माहितीही येऊन देत नसल्याची व्यथा अंकुश जाधव यांनी ॲड. नरेश राठोड यांच्यासमोर मांडली.

सर्वोदय नाक्यावर लोडिंग-अनलोडिंगचे कामगार मागील पन्नास वर्षांपासून काम करत असल्याची त्यांचीही दखल आत्तापर्यंत सरकारदरबारी घेण्यात आली नसल्याची व्यथा मोहन बोरकर यांनी मांडली. पुणे, नगर, नाशिक आदी अनेक जिल्ह्यातील हे कामगार सर्वोदय नाक्यांवर असून याठिकाणी नोंदणीची मागणी करूनही कोणी दखल घेत नसल्याचे अनेक कामगारांकडून सांगण्यात आले. तर अनेकदा स्थानिक लोकप्रतिनिधींकडून उपलब्ध असलेल्या पाण्याचे नळही कापून नेण्यात आल्याने या नाक्यांवर आम्हाला पाणीही मिळणे मुश्किल झाल्याची संतापजनक प्रतिक्रिया या कामगारांकडून देण्यात आली.

बंजारा नाका कामगार संघटनेकडून १ डिसेंबरपासून राज्यात असंघटीत क्षेत्रातील बांधकाम, नाका कामगारांसाठी राज्यव्यापी जनजागृती अभियान राबण्यात येत असून त्याचा समारोप ३ जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानात होणार आहे. या समारोपाच्या कार्यक्रमाला मुंबईतील नाका, बांधकाम, घरकामगार, लोडिंग-अनलोडिंंग, रंग कामगार आदी मोठया संख्येने उपस्थित राहून आपले प्रश्न मांडणार असल्याचे यावेळी ॲड. नरेश राठोड यांनी घाटकोपर येथील अनेक नाक्यांवरील कामगारांना सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom