महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर ‘ एक वही, एक पेन’ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर ‘ एक वही, एक पेन’

Share This

मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या महापुरुषाला अभिवादन करताना मोठ मोठे पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करण्याऐवजी ‘एक वही व एक पेन’ वाहून आगळीवेगळी श्रद्धांजली वाहण्याचा संकल्प तरुणाईने केला आहे. याचा प्रचार सध्या सोशल मीडियातून जोरदारपणे सुरू असून तरुण पिढीच्या या भूमिकेला वाढता पाठिंबा मिळत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र, देश- विदेशातून लाखो लोक दादर चैत्यभूमीवर प्रतिवर्षी येत असतात. अभिवादन करताना हे आंबेडकरी अनुयायी मोठय़ा प्रमाणावर पुष्पहार, पुष्पचक्र, मेणबत्ती व उदबत्ती चैत्यभूमीवर घेऊन जातात.
चैत्यभूमीवर वाहण्यात आलेल्या या नाशवंत वस्तूंची विल्हेवाट लावताना आयोजकांवरही अतिरिक्त ताण येत असतो. यातून मार्ग काढतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महत्त्व सांगितलेल्या शिक्षणाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी घरटी, मंडळ, संस्था आणि संघटनांनी प्रत्येकी केवळ एकच पुष्पहार, पुष्पचक्र, मेणबत्ती आणि उदबत्ती चैत्यभूमीवर घेऊन जावी व उर्वरितांनी ‘एक वही व एक पेन’ चैत्यभूमीवर ठेवून महामानवाला अभिवादन करावे, असे आवाहन या तरुणाईने सर्व आंबेडकरी जनतेला केले आहे.
जमा झालेल्या या शालेय साहित्याचे वितरण समाजातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना करण्यात यावे आणि याकामी चैत्यभूमीवर व्यवस्था पाहणा-या भारतीय बौद्ध महासभेने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही सोशल मीडियातून मोठय़ा प्रमाणावर करण्यात येत आहे. सोबतच चैत्यभूमीवर येताना महापरिनिर्वाण दिनाचे पावित्र्य, स्वच्छता तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संबंधित यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages