पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना साधे दुध देणार - रितू तावडे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना साधे दुध देणार - रितू तावडे

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 1 Jan 2016 

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सुगंधी दुधामुळे विषबाधा झाल्याने सुगंधी दुध देण्याचे बंद करण्यात आले. सुगंधी दुधाच्या बदल्यात चिक्की देण्यासाठी पालिका गेले ३ वर्षे कंत्राट देण्यात अपयशी ठरत आहे. विद्यार्थ्यांना सुगंधी दुध पालिका देवू शकत नाही आणि चिक्की देण्यात पालिकेला अपयश येत असल्याने मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्ष रितू तावडे यांनी विद्यार्थ्यांना साधे दुध द्यावे अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे. पालिकेला सुगंधी दुध आणि चिक्की देणे शक्य नसले तर विद्यार्थ्यांना साधे दुध तरी द्यावे अशी अपेक्षा रितू तावडे यांनी व्यक्त केली आहे. 

मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना २००७ पासून २७ शालेय वस्तूंसह सुगंधी दूध पुरवण्यात येत होते. पहिली ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना १३ रुपये ८६ पैसे खर्चून १२५ मिली व चौथी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना १५ रुपये ५0 पैसे २०० मिली दूध टेट्रापॅक मधून सुगंधी दुध पुरवण्यात येत होते. सन २०१२-१३ या दोन वर्षांसाठी 'महानंद' या सरकारी उपक्रमाला १२१ कोटीचे सुगंधी दुधाचे कंत्राट मंजूर करण्यात आले होते. महानंदने दिल्लीतील गोपाळजी या दूध वितरक कंपनीसोबत करार करून दूधवितरण करण्यात आले. परंतू दुध वाटपा नंतर पालिका शाळांमध्ये सहा वेळा दूधबाधेचे प्रकार घडले. पालिकेनं २००९ मध्ये सुगंधी दूध सुरू केल्यानंतर महापालिकेच्या ताडदेव शाळेत २०१० मध्ये विक्रोळी, मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये, २०११ मध्ये घाटकोपर शाळेत तर २०१२ मध्ये सप्टेंबर महिन्यात शिवडीच्या प्रबोधन ठाकरे शाळेत व २०१२ च्या ११ऑक्टोबरला मालाडच्या शाळेत  सुगंधी दूध वाटप सुरू केल्यानंतर विषबाधेची पुन्हा घटना घडली होती. सुगंधी दुधाच्या विषबाधेमुळे पालिका शाळांमधील दुध वितरण बंद करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांना सुगंधी दुधाची बाधा होत असल्यामुळे पोषण आहार म्हणून चिक्की देण्यासाठी पालिकेने चिक्की वाटपाचा निर्णय घेतला होता. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून पांढऱ्या तिळाची, शेंगदाण्याची, मिक्स आणि मिक्स डाळ चिक्की देण्याचा निर्णय घेतला. वर्षांतील १८० दिवस दररोज पालिका शाळेतील इयत्ता पहिली ते तिसरीमधील १ लाख ७० हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३० ग्रॅम, तर चौथी ते दहावीमधील २ लाख ३० हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४० ग्रॅम चिक्की देण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र निर्णय घेतल्या नंतर पालिकेला सन २०१३ -१५ पासून अद्याप चिक्की वाटप करण्यात अपयश आले आहे. पालिकेने २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात ६५ कोटींची सन २०१४-१५ मध्ये ८४ कोटी आणि सन २०१५ - १६ मध्ये ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हि तरतूद अशीच पडून असल्याने या निधीचा वापर होणे गरजेचे आहे. साधे दूध दिल्यास विद्यार्थ्याना पचनासाठीही सोपे असल्याने पालिका आयुक्तांनी विद्यार्थ्यांना साधे दुध देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन रितू तावडे यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages