मराठी पुस्तक विक्रीसाठी गाळे भाड्यात सवलत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 January 2016

मराठी पुस्तक विक्रीसाठी गाळे भाड्यात सवलत

मुंबई / JPN NEWS.in / 1 Jan 2016
नव्या वर्षाची सुरुवात मराठी ग्रंथ विक्रेत्यांसाठी, वितरकांसाठी आणि रसिक वाचकांसाठी उत्साहवर्धक ठरली आहे. महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या गाळ्यांतील 500 ते 1000 चौ. फूट आकारमानाचा गाळा मराठी पुस्तकांच्या विक्रीसाठी अल्प भाड्याने देण्यात येणार आहे. याबाबतचे परिपत्रक आज महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने काढले आहे, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी दिली.

गेल्या वर्षी घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनात बोलताना तावडे यांनी मराठी पुस्तकांच्या विक्रीसाठी नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात गाळ्यांना सवलतीच्या दरात भाडे आकारण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सकारात्मक प्रतिसाद दर्शविला होता.

दरम्यान, मराठी भाषा विभागाने नगरविकास खात्याकडे प्रस्ताव पाठविला आणि पाठपुरावा केला. त्यानुसार हा निर्णय जाहीर झाला आहे. हा मराठी साहित्याला व वाचन संस्कृतीला चालना देणारा निर्णय आहे. यामुळे पुस्तक खरेदीचे अनेक पर्याय रसिक वाचकांना उपलब्ध होतील आणि वितरकांना व प्रकाशकांनाही आर्थिक गणित साधणे सोपे जाईल, असे प्रतिपादन श्री.तावडे यांनी केले. शहरी व निमशहरी भागांतील इच्छुक मराठी पुस्तक विक्रेत्यांनी व वितरकांनी या सवलतीचा अधिकाधिक प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहनही तावडे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad