Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांसाठी कैदेची मागणी - दिवाकर रावते

मुंबई / JPN NEWS.in / 1 Jan 2016
मद्यपान करून किंवा अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवण्याच्या गुन्ह्यासाठी अनुज्ञप्ती निलंबनाबरोबर मा.न्यायालयाकडे पहिल्या गुन्ह्यासाठी आरोपीसाठी कैदेची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. आज मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव गौतम चटर्जी, परिवहन आयुक्त सोनिया सेठी उपस्थित होत्या.

रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहन चालवताना होणाऱ्या गुन्ह्यांसाठी शासनाने आता कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगून श्री. रावते म्हणाले की, विहित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, लाल सिग्नल ओलांडून जाणे, मालवाहू वाहनातून क्षमतेपक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे, दारू‍‍ पिऊन किंवा अंमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे, यासारख्या गुन्ह्यांसाठी वाहनचालकांची अनुज्ञप्ती (Driving License) ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे.


हेल्मेट चा वापर

या सगळ्याबरोबरच हेल्मेट बाबतचे नियम संपूर्ण राज्यभर लागू असतील. हेल्मेट न घालणाऱ्या तसेच सीट बेल्ट न बांधणाऱ्या वाहनचालकांना त्यांच्या गुन्ह्यासाठी किमान 2 तासाच्या कालावधीसाठी समुपदेशनासाठी उपस्थित राहावे लागणार आहे. तसे शासन आदेशही निर्गमित करण्यात आले आहेत.

60 हजार ऑटोरिक्षा परवान्यांचे फेरवाटप

शासनाने राज्यामध्ये 60 हजार ऑटोरिक्षा परवान्यांचे फेरवाटप करण्याचा निर्णय घेतला असून ऑनलाईन पद्धतीने लॉटरी प्रक्रिया सुरु केली आहे, अशी माहिती देऊन श्री. रावते पुढे म्हणाले की, महाऑनलाईनच्या संकेतस्थळावर लॉटरीसाठी अर्जदारांनी अर्ज करणे आवश्यक आहे, तसे आवाहन करण्यात आले आहे. हे अर्ज पहिल्यांदाच मराठीतून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आतापर्यंत यासाठी 23,548 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 97 अर्ज महिलांनी केले आहेत.

परवाने वितरणात महिलांना पाच टक्के आरक्षण

यामध्ये महिलांना पाच टक्के परवान्यांचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. तसेच महिलांना ऑटोरिक्षा परवाने मिळवण्यासाठी एक वर्ष अनुज्ञप्ती अनुभवाची अट देखील काढून टाकण्यात आली आहे.

एस.टी महामंडळात परिवहन विभागाचा अधिकारी

परिवहन विभागातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचा अधिकारी आता एस.टी महामंडळामध्ये प्रतिनियुक्तीने नियुक्त केला जाईल. त्यामुळे अवैध वाहतूक रोखण्यास मदत होईल, असेही श्री. रावते यावेळी म्हणाले. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्व सिग्नलला आता सी.सी.टी.व्ही बसवण्यात येणार असून त्यामुळे वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या सर्व वाहनचालकांवर अंकूश ठेवणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.

काल सन 2015 च्या शेवटच्या दिवशी 24 तासात मुंबई शहरातील पोलीस विभागाकडून 10,534 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या व्यक्तींची संख्या 705 हेल्मेट न वापरता वाहन चालविणारे 1906 वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे 7,923 व्यक्तींचा समावेश होता. चित्रपटगृहात राष्ट्रगीतासाठी उभे राहा, अशी सूचना इंग्रजी आणि हिंदीतून पडद्यावर सूचना दिली जाते. ती मराठीतूनही दिली जावी, अशी मागणी करणारे पत्र आपण महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना दिले असल्याचेही श्री. रावते यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom