मुंबई महानगरपालिका सध्या घोटाळ्यांमुळे सतत गाजत आहे, महापालिकेत इ टेंडरिंग, नालेसफाई, रस्त्याच्या डेब्रिजचा घोटाळा झाल्यानंतर आता कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा भरतीमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. मुंबई महानगरपालिकेत मागासवर्गीय समाजातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत आहेत. अश्या मागासवर्गीय चतुर्थ श्रेणी कामगारांच्या हक्काच्या अनुकंपा नोकऱ्या भलत्याच लोकांनी लाटल्या आहेत.
मुंबई महानगरपालिकेत एके काळी ४० हजार सफाई कामगार सफाईचे काम करत होते. महापालिकेत गेले २४ वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपाच्या मागासवर्गीय कामगार, अधिकाऱ्यांकडे बघण्याच्या दृष्टीकोनामुळे आणि रिक्त पदे भरण्याकडे मुद्दामच केलेल्या दुर्लक्षामुळे महापालिकेत सध्या फक्त सफाई कामगारांची संख्या २८ हजार इतकीच राहिली आहे.
मुंबई महानगरपालिकेत फक्त सफाई कर्मचारी निवृत्त झाल्यास किंवा त्याचा सेवे दरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकांना नोकरी दिली जाते असा नियम आहे. इतर कोणत्याही विभागात अनुकंपा नोकरी दिली जात नसल्याने मुंबई महानगरपालिकेत मागासवर्गीय आणि ओपन अशी मिळून २८ हजाराहून अधिक पदे रिक्त आहेत. हि रिक्त पदे भरली जावीत म्हणून सातत्याने वृत्तपत्रातून आवाज उचलल्यावर माजी महापौर सुनील प्रभू यांनी हि रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याचे आदेश प्रशासनाला पालिका सभागृहात दिले होते.
महापौरांनी पालिकेच्या सर्वोच्च असलेल्या सभागृहात आदेश दिलेले असतानाही प्रशासनाने रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे सरकारी नोकऱ्यांप्रमाणे पालिकेच्या नोकऱ्या मिळणेही बंद झाले आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आजही लोक हवा तितका पैसा टाकण्यास तयार असतात हे सर्वाना माहित असल्याने काही लोकांनी मिळून सध्या मिळणारी सफाई कामगारांच्या जागी अनुकंपा नोकरी मिळवून द्यायचे काम सुरु केले.
अश्या या दलाल मंडळींनी यासाठी महापालिकेतील ज्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक नाहीत, ज्यांच्या नातेवाईकांनी नोकरीसाठी अर्ज केला नाही, ज्यां कार्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना पालिकेची सफाई खात्यातील नोकरी नको अश्या लोकांना आपल्या जागी इतरांना नोकरी देण्यासाठी तयार केले असावे. याबदल्यात संबंधित कर्मचाऱ्याला किंवा त्याच्या वारसांना पैसे देवून अनुकंपा नोकरी नको इतरांना अनुकंपा नोकरी द्या असे शपथपत्रावर लिहून घेतले असण्याची शक्यता आहे.
एखाद्या कर्मचाऱ्याने किंवा त्याच्या वारसाकडून अनुकंपा नोकरी नको असे नुसते शपतपत्रावर लिहून घेतले म्हणून इतरांना अनुकंपा नोकरी सहज मिळाली असेल असे नाही. ज्याला अनुकंपा नोकरी हवी आहे त्या व्यक्तीला संबंधीत कर्मचाऱ्यांचा नातेवाईक आहे हे दाखवण्यासाठी खोटी कागदपत्रेही बनवली गेली असावीत. काही लोकांनी तर कर्मचाऱ्यानी दत्तक घेतले असे कायदेशीर मार्गाने दाखवण्यासाठी हजारो रुपये खर्च केल्याची चर्चा आहे.
खोटी कागदपत्रे आणि खोटे नातेवाईक दाखवून मुंबई महानगर पालिकेची फसवणूक करत शेकडो नोकऱ्या अश्या प्रकारे वाटण्यात आल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागातील वार्डमधील शिपाई, क्लार्क, हेड क्लार्क, सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक, मुख्य पर्यवेक्षक अश्या ज्या ज्या अधिकाऱ्यांकडे या अनुकंपा नोकऱ्या मंजूर करण्यासाठी फाईली गेल्या त्या त्या अधिकाऱ्याला पैशांनी खुश करून खोट्या नातेवाईकांनी नोकऱ्या लाटल्या आहेत. एका अनुकंपा नोकरीसाठी ७ ते १० लाख रुपये पालिका अधिकारी आणि दलालांनी घेतले आहेत. यामधील ३० ते ४० टक्के रक्कम संबंधित कर्मचारी किंवा त्याच्या वारसांना आणि इतर उरलेली रक्कम पालिका अधिकाऱ्यांना वाटण्यात आली आहे.
या प्रकरणी डिसेंबर महिन्यात पालिकेच्या दोघा कर्मचाऱ्यांसह पाच जणांना गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. डी विभागाचा मुख्य पर्यवेक्षक देवजी प्रेमजी राठोड, दिलीप चौकेकर आणि अनिल बालिया, कुणाल जोगडिया आणि सन्नी विनजुडा अशी त्यांची नावे आहेत. चौकेकर व बालिया हे महापालिकेचे कर्मचारी असून अन्य दोघे एजंट आहेत. या रॅकेटमध्ये महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकारी गुंतले असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. आ रॅकेटकडून ३०० जणांना अशा प्रकारे नोकऱ्या लावण्यात आल्या असून त्यातून कोट्यवधीचा गैरव्यवहार करण्यात आल्याची माहिती उपलब्ध होत आहे.
पालिकेच्या डी वॉर्डात अशाच प्रकारे १० कर्मचारी कामावर रूजू झाल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ३च्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने डी विभागाचा मुख्य पर्यवेक्षक देवजी प्रेमजी राठोड, दिलीप चौकेकर अनिल बालिया या दोन पालिका कर्मचाऱ्यांसह कुणाल जोगडिया आणि सन्नी विनजुडा या दोन एजंटवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या घरांच्या झडतीत या भरती प्रक्रियेत वापरण्यात येत असलेले बनावट स्टॅम्प, परवानगी पत्रांसह महत्त्वपूर्ण कागदपत्रांचा दस्तऐवज पोलिसांनी हस्तगत केला असल्याची माहिती मिळत आहे.
महानगरपालिकेच्या डी विभागात सफाई कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या बोगस नातेवाईकांनी हडपल्याचे उघड झाल्यावर पालिकेच्या २४ वॉर्डमध्ये कार्यरत असलेल्या गेल्या ५ वर्षांतील उमेदवारांच्या माहितीचा शोध गुन्हे शाखेकडून घेण्यात येत आहे. हि शोध मोहीम पालिका कार्यालयातून सुरु असताना या बोगस अनुकंपा नोकऱ्याबाबत पालीकेंमध्ये साधी चर्चा सुद्धा केली जात नसल्याने बोगस अनुकंपा नोकऱ्यांचा पैसा महापालिका मुख्यालयातील बड्या अधिकाऱ्यापर्यंत पोहचला का असा संशय निर्माण होत आहे.
मुंबई महानगरपालिकेचे तीन अधिकारी आणि दोन दलाल या प्रकरणी पकडले गेले आहेत. गुन्हे शाखेकडून आपल्या पद्धतीने तपास सुरु आहे. मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. डिसेंबर २०१५ च्या सुरुवातीला हा घोटाळा उघडकीस आला. या प्रकरणाला एक महिना होत आला तरीही पालिका आयुक्त, सत्ताधार्यांनी किंवा विरोधकांनी या प्रकरणी चौकशी करण्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास येत आहे.
मुंबई महानगरपालिकेत सफाई कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नोकऱ्या त्यांच्याशी संबंध नसलेल्या भलत्याच लोकांनी लाटल्याचे उघड झाले आहे. पालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्यास पुढाकार घ्यायला हवा. पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या लाटणाऱ्या आणि त्यांना पैसे घेवून मदत करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करायला हवी. पालिका आयुक्त या प्रकरणाची चौकशी करण्यास तयार नसतील तर विरोधकांनी या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी करून दोषीवर कारवाई करण्यास आयुक्तांना भाग पाडायला हवे.
अजेयकुमार जाधव (मो. ९९६९१९१३६३)
No comments:
Post a Comment