| मुंबई / www.JPNnews.in
‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध देशातील पंतप्रधान आणि मंत्री तसेच उच्चस्तरीय शिष्टमंडळांशी चर्चा करून महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. परराष्ट्रीय शिष्टमंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने ‘मेक इन महाराष्ट्रा’ची यशस्वी वाटचाल होण्यास मदत मिळत आहे. आजच्या दिवशीही स्वीडन, जर्मनी, जपान, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया आणि बांग्लादेशच्या शिष्टमंडळांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
सकाळी ट्रायडण्ट हॉटेलमध्ये जर्मनीचे वित्त् व ऊर्जामंत्री उवे बेकमेयर यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय श्ष्टिमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त यू.पी.एस. मदान, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये जर्मन कंपन्यांनी सहभागी व्हावे- मुख्यमंत्री
महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी मुलभूत पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये मेट्रो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक यासारखे महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये जर्मन कंपन्यांनी सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. राज्यामध्ये बंदरांचा विकास हाती घेण्यात आला असून पोर्ट कनेक्टिव्हिटी सार्वजनिक सहभागी तत्त्वावर करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्रात जर्मन कंपन्यांनी गुंतवणूक केली असून भविष्यातही राज्याच्या विविध भागात औद्योगिक गुंतवणूक वाढवावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी व्हॉल्वो कंपनीचे अध्यक्ष मार्टीन लँडस्टेन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ‘मेक इन इंडिया’ सप्ताहासाठी मुंबईत दाखल झालेले ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी हॉटेल ट्रायडंट येथे भेट घेऊन त्यांचे स्वागत केले व चर्चा केली.
न्यूझीलंड सरकार व तेथील कंपन्यांच्या गुंतवणुकीचे स्वागत- मुख्यमंत्री
‘मेक इन इंडिया’ सेंटरमधील महाराष्ट्र पॅव्हेलिअनमध्ये न्यूझीलंडचे उच्चायुक्त ग्रॅहम मोर्टन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधींबाबत चर्चा करण्यात आली. स्मार्ट सिटी आणि पर्यटन क्षेत्रातील सहकार्याबद्दल दोन्ही मान्यवरांची यावेळी चर्चा झाली. महाराष्ट्र आणि न्यूझीलंडमध्ये सहकार्याचे धोरण राहील, अशी आशा उच्चायुक्त ग्रॅहम मोर्टन यांनी व्यक्त केली. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. राज्यात सामाजिक पर्यटन, वन पर्यटन, साहसी पर्यटन, कृषी पर्यटन या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे. तसेच महाराष्ट्रात आता स्मार्ट सिटीही उभारण्यात येत आहेत. या दोन्ही क्षेत्रात न्यूझीलंड सरकार व तेथील कंपन्यांच्या गुंतवणुकीचे स्वागत असल्याचे श्री.फडणवीस म्हणाले. न्यूझीलंडचे उच्चायुक्त मोर्टन म्हणाले, महाराष्ट्र हा नेहमीच न्यूझीलंडसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिला आहे. स्मार्ट सिटी व पर्यटन या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी संधी आहेत. याबाबत नक्कीच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
पोहंगमधील उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आमंत्रण
दक्षिण कोरियातील पोहंग शहराचे महापौर ली कांग डेओक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र पॅव्हेलियन’मध्ये भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये आर्थिक सहकार्याबद्दल चर्चा झाली. महाराष्ट्राबरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचे डेओक यांनी सांगितले. दक्षिण कोरियातील पोहंग चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे चेअरमन योन केंग सू, सदस्य किम गु आर्म, चेऑंग जी हुआ, जूंग योन टाय, जो जी हाँग, किम सिन, पेयॉन जंग सब आदी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, दक्षिण कोरिया हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा देश आहे. पोहंग शहराबरोबर मैत्रीपूर्ण संबंधासाठी महाराष्ट्र शासन उत्सुक आहे. पोहंगमधील उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आग्रहाचे आमंत्रण आहे. पोहंग शहराच्या उद्योजकांना येथे उद्योग उभारण्यासाठी नक्कीच महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. महाराष्ट्रात उत्पादन निर्मिती क्षेत्रात खूप संधी उपलब्ध आहेत. उद्योगांसाठी राज्य शासनाने ‘इज ऑफ डुईंग बिजनेस’ अंतर्गत परवानग्यांची संख्या कमी केली आहे. त्यामुळे अनेक उद्योजक गुंतवणुकीस इच्छुक आहेत. पोहंगचे महापौर डेओक म्हणाले, ‘मेक इन इंडिया’ सेंटरला भेट देऊन आनंद झाला. भारत हा वैविध्यपूर्ण देश आहे. येत्या काळात भारताला उज्ज्वल भवितव्य असून अनेक संधी निर्माण होणार आहेत. या देशाबरोबर चांगले आर्थिक संबंध निर्माण करुन काम करण्यास आम्ही नेहमीच तयार आहोत.
बांग्लादेशाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट
बांग्लादेश हा आपला शेजारी देश असून या देशाशी नव्याने संबंध प्रस्थापित करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भारतातील बांग्देशाचे उच्चायुक्त सय्यद मुअजीम अली यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. अली म्हणाले, बांग्लादेश आणि भारताचे फार जुने संबंध आहेत आणि ते अधिक दृढ करण्यावर भर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचेही ते म्हणाले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, अपर मुख्य सचिव सुमित मलिक आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबईतील प्रकल्प पूर्णत्वासाठी जपानने प्रयत्न करावेत- मुख्यमंत्री
मुंबईमध्ये जपानच्या सहकार्याने सुरू असलेले प्रकल्प पूर्णत्वासाठी जपानने प्रयत्न करावेत जेणेकरुन मुंबईकरांना वाहतुकीचे पर्याय खुले होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी जपानच्या पंतप्रधानांचे विशेष सचिव हिरोटो इझुमी आणि त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो कॉरीडॉर, ट्रान्स हार्बर लिंक असे अनेक प्रकल्प जपानच्या सहकार्याने सुरू असून विकसित तंत्रज्ञानाच्या मदतीने जपानने हे प्रकल्प लवकर पूर्ण करावेत जेणेकरुन पुढील पाच वर्षांत मुंबईवर पडणारा वाहतुकीचा ताण कमी होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. ‘मेक इन इंडिया’ सप्ताहातील दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात ‘औद्योगिक गुंतवणुकीच्या संधी’ परदेशातील शिष्टमंडळांना मुख्यमंत्र्यांनी अवगत करून दिल्या. त्याला या विविध देशांतील शिष्टमंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद देखील मिळत आहे. |
Home
Unlabelled
महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
Share This
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN News is a trusted Marathi digital news portal operating since 2012-13. JPN News is registered as a news agency with the Government of India. This portal mainly focuses on important social, political, economic, cultural developments in Mumbai, suburbs and Maharashtra. Its main objective is to deliver fast, honest and local to state-level news to the people. Reliability, speed and local vibe are the hallmarks of JPN News.

No comments:
Post a Comment