सन २०१६-१७ या अर्थसंकल्पीय वर्षात सुमारे १६ लाख रुपयांची तरतूद
MUMBAI http://www.jpnnews.in दि. 23 Feb 2016 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. महापालिकेचे विद्यार्थी आज आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात सहभाग घेऊन महापालिकेचे नाव सातासमुद्रापार पोहोचवित आहेत. क्रीडा क्षेत्रात नावलौकिक संपादन करणाऱया विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी व या क्षेत्रात भरीव कार्य करण्यासाठी अर्थसंकल्पात यावर्षी सुमारे १६ लाख रुपयांची तरतूद केली आहे आणि अशा गुणवंत विद्यार्थी क्रीडापटूंचा विशेष गौरव करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी प्रशासनाला दिले. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांचा बालक मेळावा व क्रीडा प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज (दिनांक २३ फेब्रुवारी, २०१६) सकाळी परळ येथील सेंट झेव्हिअर्स मैदान येथे संपन्न झाला, यावेळी त्या बोलत होत्या.
महापौर म्हणाल्या की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे प्रत्येक महिन्याला नाविण्यपूर्ण आणि रोमहर्षक कार्यक्रम आयोजिले जातात. पालिकेचे हे सर्व कार्यक्रम पाहिल्यानंतर खासगी शाळांनाही मागे टाकतील, इतकी गुणवत्ता महापालिकेच्या विद्यार्थ्यांमध्ये असल्याचे स्पष्ट होते. महापालिका प्रशासनाचे यात योगदान आहे. महापालिकेच्या शाळांतील पटसंख्या कमी होत असल्याचे सांगितले जाते. पण असे कार्यक्रम आणि यश पाहिले की, महापालिका कोणत्याही क्षेत्रात कमी नाही, याची प्रचिती येते. महापालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत संगीत व कला अकादमी, हस्तकला, शारीरिक शिक्षण, स्काऊट आणि गाईड्स हे सर्व विभाग आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी आणि नाविण्यपूर्ण उपक्रम करीत आहेत. त्याकरीता महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी नियोजनबद्ध प्रयत्न करीत आहेत. लोकप्रतिनिधीदेखील काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण विकासासाठी आवश्यक ती सर्व अत्याधुनिक साधनसामुग्री पुरवित आहे. महापालिकेचे विद्यार्थी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचून पालिकेचे नाव उज्ज्वल करीत आहेत, याचा सार्थ अभिमान असल्याचे महापौर आंबेकर यांनी नमूद केले.
अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांनी सांगितले की, आजच्या बालक मेळाव्यातून विद्यार्थ्यांनी ज्या विविध खेळांचे प्रात्यक्षिक दाखविले ते पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. महापालिका सर्व क्षेत्रात आपले वेगळेपण दाखवित असते. बालक मेळाव्यातून सर्वांचा उत्साह वाढला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे श्रीमती पल्लवी दराडे यांनी सांगितले. प्रसिद्ध अभिनेते जॅकी भगनानी यांनीही शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा सक्षम होण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रावरही लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले. महापालिका विविध क्षेत्रात करीत असलेल्या कार्याबद्दल त्यांनी कौतुक केले. बालक मेळाव्यात विद्यार्थ्यांनी संचलन, आरएसपी, फॅन्सी ड्रील, मल्लखांब व रोप स्किपिंग, मानवी मनोरे, योगासने, मोठी रंग फॉलिक्स, लेझिम आदी प्रकार सादर केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळविणाऱया विद्यार्थ्यांचा महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. उप शिक्षणाधिकारी (मध्यवर्ती) डॉ. जीवबा केळुसकर यांनी प्रास्ताविक केले तर उप शिक्षणाधिकारी प्रकाश चऱहाटे यांनी आभार मानले

No comments:
Post a Comment