मूल्याध्याष्ठित शिक्षण व्यवस्थेमुळे भारतीयशिक्षण व्यवस्था आणि संस्कृती टिकून- सुधीर मुनगंटीवार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मूल्याध्याष्ठित शिक्षण व्यवस्थेमुळे भारतीयशिक्षण व्यवस्था आणि संस्कृती टिकून- सुधीर मुनगंटीवार

Share This
मुंबई http://www.jpnnews.in
भारतीय संस्कृतीमधून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दिल्या गेलेल्या मुल्याधिष्ठित शिक्षणातून ना केवळ भारतीय शिक्षणव्यवस्था टिकून राहिली परंतू तिने संस्कृती विकासाला पूरक स्वरूपाचे काम केले असे प्रतिपादन वित्त व नियोजनमंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा ६५ वा दीक्षांत समारंभ संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास विद्यापीठाच्या कुलगुरू प्रो. वसुधा कामत यांच्यासह अनेक प्राध्यापक,  मान्यवर आणि विविध विषयात पदवी प्राप्त विद्यार्थिनी उपस्थित होत्या.  

कागदाच्या पदवीवर प्रेम करणारी शिक्षणपद्धती नको त्याला कल्पक विद्ववत्तेची जोड हवी असे सांगून वित्तमंत्री ना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, पूर्वी शिकलेली व्यक्ती ही ज्ञानसंपन्न समजली जायची परंतू आता तंत्रज्ञानाने ज्ञानाच्या कक्षा इतक्या विस्तारल्या आहेत की जो हे ज्ञान कुटुंबाबरोबर समाजासाठी कल्पकतेने उपयोगात आणतो तो ज्ञानी समजला जाऊ लागला आहे. शिक्षणाचा अर्थ आत्म्याचा विकास आहे. तक्षशीला, नालंदा सारख्या विद्यापीठांच्या माध्यमातून चौथ्या शतकापासून भारतीय शिक्षणव्यवस्थेचा उल्लेख अतिशय गौरवाने केला जातो. असं असलं तरी जगातील २०० उत्तम विद्यापीठांच्या यादीत आपल्या एकाही विद्यापीठाचा समावेश नाही, याचा देखील आपल्याला विचार करण्याची गरज असल्याचे वित्तमंत्री ना  मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. 
 
ते म्हणाले की, क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात महिला शिक्षणाची बीजं रुजवली, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेची हाक देतांना दोन रुपये मिळवत असाल तर एक रुपया भाकरीसाठी आणि एक रुपया ज्ञानी होण्यासाठी पुस्तक खरेदी करण्यात खर्च करा असा संदेश समाज मनाला दिला.त्यातून महिला शिक्षणाची आणि महिलांच्या समान हक्काची चळवळ वेगवान झाली. सृजनशील विश्वनिर्मितीमध्ये महिलांचे योगदान मोठे आहे, मुलगा एका परिवाराचा वंश पुढे नेतो, मुलगी दोन परिवाराचा वंश पुढे नेते. त्यामुळे चांगला समाज आणि सुदृढ कुटुंब घडवायचे असेल, देश घडवायचा असेल तर समाजातील चांगुलपणाची पुजा केली गेली पाहिजे. हे लक्षात घेऊन मोठा विचार करा, मोठ्ठं लक्ष्य, उद्दिष्ट मनाशी बाळगा, तुम्ही आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल.  
 
नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ शतकमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. यानिमित्ताने त्यांनी अनेक कार्यक्रम हाती घेतले आहेत. या कार्यक्रमासाठी आवश्यक असणारा सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही देताना वित्तमंत्र्यांनी“ऐसी जिंदगी ना जियो, की लोग आपकी फर्याद करे, जिंदगी एैसी जियो- की लोग बार बार आपको याद करे... असा संदेशही दिला.

विद्यापीठाच्या कुलगुरू वसुधा कामत यांनी यावेळी विद्यापीठाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने  विविध विषयात प्राविण्य मिळवलेल्या १५४३१ विद्यार्थिनींना पदवी प्रदान करण्यात आली. पीएच.डी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या ४४ इतकी आहे. यातील काही विद्यार्थिनींना प्रातिनिधीक स्वरूपात वित्तमंत्री मुनगंटीवार यांच्याहस्ते पदवीचे वितरण करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages