पदवीला कौशल्याची जोड द्यालेखणीचा उपयोग समाजाच्या हितासाठी करा- सुधीर मुनगंटीवार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पदवीला कौशल्याची जोड द्यालेखणीचा उपयोग समाजाच्या हितासाठी करा- सुधीर मुनगंटीवार

Share This
मुंबई http://www.jpnnews.in
मुंबई विद्यापीठाच्या कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम विभागातून आज पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवीला कौशल्याची, अनुभवाची जोड द्यावी आणि आपल्या लेखनीचा उपयोग समाजाच्या हितासाठी सकारात्मकदृष्टीने करावा असे आवाहन वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मुंबई विद्यापीठाच्या कम्यूनिकेशन ॲण्ड जर्नालिझम विभागातील पदवींचे प्रदान वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा, बीसीयुडीचे संचालक प्राचार्य डॉ. अनिल पाटील,  विभागाचे प्रमुख डॉ. सुंदर राजदीप, प्रो. डॉ. संजय रानडे यांच्यासह इतर मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

पत्रकारितेची पदवी प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आज ज्ञान आणि ज्ञानीची व्याख्या बदलली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीने माहितीचा प्रवाह आपल्या हातातील मोबाईलवर उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ज्ञानी व्हायचं असेल तर ज्ञानाला कल्पकतेची जोड देऊन कौशल्य विकसित केली पाहिजेत. आपल्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग केला पाहिजे. उत्तम आणि अभ्यासू पत्रकार होण्यासाठी त्या व्यक्तीकडे सर्व क्षेत्रातील ज्ञान असणे अपेक्षित आहे. अर्धवट ज्ञानावर आज कुणालाच पुढे जाता येत नाही. सेल्फी काढण्याच्या नादात माणसं “सेल्फीश” म्हणजे स्वार्थी होणार नाहीत असे वातावरण तयार करण्याची खरी गरज आहे. पत्रकार म्हणून असे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यावरही आहे.  त्यामुळे समाज आणि कुटुंबाला तुमचा अभिमान वाटेल असे काम करा असे ही वित्तमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

माध्यमांचे क्षेत्र आज झपाट्याने विस्तारत आहे. या प्रवाहात सहभागी होतांना तुमचे लक्ष्य, तुमचे उद्दिष्ट हे एकदम स्पष्ट असले पाहिजे असे प्रतिपादन दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी केले.  बदलत्या माध्यम प्रवाहात आपली दिशा निश्चित करतांना  विद्यापीठाचा पत्रकारिता विभाग आणि दूरदर्शन यांच्या संयुक्त प्रयत्नातून प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करता येतील असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात वित्तमंत्र्यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक मिडिया, फिल्म स्टडिज, टेलिव्हिजन स्टडिज, पब्लिक रिलेशन ॲण्ड जर्नालिझम या विषयातील  १६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.  मुनगंटीवार यांच्या हस्ते यावेळी विद्यापीठाच्या कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम विभागाच्या संकेतस्थळाचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. सुंदर राजदीप यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages