मुंबई, दि. 28 : विविध गुन्ह्यांच्या पोलीस तपासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन महासंचालक श्रीमती डॉ. मीरा च. बोरवणकर (न्यायिक व तांत्रिक) यांच्या हस्ते आज करण्यात आले.
नवीन प्रशासन भवनातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या मुख्यालयात हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गृह विभागाचे उपसचिव डी.एस.गायकवाड, सहायक संचालक सं.औ.चेट्टी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे कक्ष अधिकारी अजय गुप्ता आदी उपस्थित होते.
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय हे महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील देशातील गुणवत्ता प्रधान गुन्हा विश्लेषणास मदत करणारी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे. भारतामधील अग्रगण्य प्रयोगशाळामध्ये या प्रयोगशाळेचा समावेश होतो.
संचालनालयाची स्वतंत्र वेबसाईट dfsl.maharashtra.gov.in
राज्यात न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिपत्याखाली मुंबई येथे मुख्यालय असून नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड व कोल्हापूर येथे प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा कार्यरत आहे. संचालनालयाच्या महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) डॉ. मीरा च. बोरवणकर यांच्या प्रयत्नाने व मार्गदर्शनाखाली संचालनालयाची स्वतंत्र वेबसाईट प्रणाली dfsl.maharashtra.gov.in या वेबलिंक द्वारे विकसित करण्यात आली आहे.
आता वेबसाईटवर मिळणार विश्लेषण अहवाल
संचालनालयाच्या वेबसाईट प्रणालीमध्ये सर्व प्रयोगशाळेतील प्रतिवेदित केलेले विश्लेषण अहवाल पोलीस तपासी अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध करुन दिलेले आहेत. हे अहवाल संबंधित पोलीस ठाण्यास लॉग-इन आयडी करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे तपासी यंत्रणेला जलदगतीने अहवाल मिळण्यास मदत होणार आहे. या वेबसाईटवर विश्लेषण अहवाल तपासी यंत्रणांना उपलब्ध करुन देणारी राज्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय ही देशातील पहिली प्रयोगशाळा आहे.
संकेतस्थळाविषयी माहिती
राज्यातील सर्व प्रयोगशाळेची एकत्रित माहिती, पोलीस तपासी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, अभियोक्ता व सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच सेवा व सुविधा, उपक्रम, प्रयोगशाळेत दाखल होणाऱ्या प्रकरणांची सांख्यिकी माहिती, महत्वाच्या समित्या, प्रशिक्षण, भरती, जाहिराती, परिपत्रके, विभागांची माहिती, माहिती अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक व पत्ते, विश्लेषण करताना उपयोगी पडणाऱ्या उपकरणांची माहिती, रिक्त पदांची माहिती, निविदा आदी माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे त्याच बरोबर माहिती अधिकार अधिनियम-2005 नुसार आवश्यक 17 बाबींची माहितीसुध्दा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. हे संकेतस्थळ विकसित करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक श्री. मुथुकृष्णन, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचे प्रभारी संचालक बा.ब.दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुकेश सोनकुवर, अजय गुप्ता, महाऑनलाईनचे प्रतिनिधी आदींनी मोलाची भूमिका बजावली.


No comments:
Post a Comment