मुंबई, दि. २८ : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत मे २०१६ साठी अंत्योदय योजनेच्या मुंबई-ठाणे क्षेत्रातील १९२५१ शिधापत्रिकाधारकांसाठी एकूण 673 मेट्रिक टन अन्नधान्याचे नियतन मंजूर करण्यात आले आहेत.
मे 2016 साठी 346 मेट्रिक टन तांदूळ व 327 मे टन गहू याप्रमाणे प्रति शिधापत्रिकाधारकास प्रतिमाह ३५ किलो अन्नधान्य असे परिमाण आहे. लाभार्थ्यांना विहित वेळेत अन्नधान्याचा पुरवठा होईल याची दक्षता घेण्याबाबत निर्देश शिधावाटप व संचालक नागरी पुरवठाचे प्रभारी नियंत्रक यांनी परिमंडळातील सर्व शिधावाटप उपनियंत्रक आणि अधिकारी यांना दिले आहेत.
मे महिन्यासाठी ६५०४९ लोकसंख्येसाठी ५.८४७ मेट्रीक टन तांदूळ आणि २.५०९ मेट्रिकटन गहू अधिकृत शिधावाटप दुकानात शिल्लक साठा उपलब्ध आहे. परिमंडळ अ,ड,ई,ग आणि फ करिता २९१.५७७ मेट्रीक टन तांदूळ आणि २७६.१९४ मेट्रीक टन गहू एवढे नियतन मंजूर आहे. अन्नधान्य पोहोचविण्याच्या व उचल पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून मे २०१६ करिता अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांसाठी वितरण आदेश त्वरीत प्राप्त करून घेण्याच्या सूचना संघटित संस्थांना द्याव्यात, असेही सूचित करण्यात आले आहे. अधिकृत शिधावाटप दुकानदारांनी अथवा संघटित संस्थांनी मुदतीत १०० टक्के धान्याची उचल न केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रभारी नियंत्रक यांनी सांगितले आहे.


No comments:
Post a Comment