मुंबई - घरगुती गॅस सिलिंडरवर देण्यात येणाऱ्या शासकीय अनुदानाचा (सबसिडी) त्याग करण्याबाबतच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला देशात सर्वाधिक प्रतिसाद महाराष्ट्रातून मिळाला असून, राज्यातील एकूण सोळा लाखांहून अधिक नागरिकांनी अशा अनुदानाचा त्याग केला आहे. राष्ट्रहितासाठी राज्यातील नागरिकांनी दिलेले हे योगदान अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
घरगुती गॅसच्या वापरासाठी नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सिलिंडरवर शासनातर्फे अनुदान देण्यात येते. त्यापोटी केंद्र सरकारला मोठा वित्तीय भार सहन करावा लागतो. या अनुदानाची गरज नसलेल्या नागरिकांनी अनुदानाचा त्याग करावा, असे आवाहन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यासाठी देशभरात "गिव्ह इट अप‘ मोहीम हाती घेण्यात आली होती. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने याबाबतची तपशीलवार आकडेवारी जाहीर केली आहे. देशात एकूण 14 कोटी 54 लाख नागरिक एलपीजी गॅसधारक आहेत. त्यापैकी एक कोटीहून अधिक नागरिकांनी या अनुदानाचा त्याग केला. राज्यातील 16 लाख 42 हजार 814 नागरिकांनी या अनुदानाचा त्याग केला.
राज्यापाठोपाठ उत्तर प्रदेश
महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश (12 लाख 53 हजार 242), दिल्ली (7 लाख 27 हजार 374), कर्नाटक (6 लाख 97 हजार 710) आणि तामिळनाडू (6 लाख 47 हजार 985) याप्रमाणे पहिल्या पाच राज्यांची क्रमवारी आहे. या पाचही राज्यांनी एकूण आकडेवारीत जवळपास पन्नास टक्के एवढा वाटा उचलला आहे.


No comments:
Post a Comment