पर्यावरण संतुलनासाठी वैज्ञानिक पर्यावरणपूरक आराखडा तयार करणार - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पर्यावरण संतुलनासाठी वैज्ञानिक पर्यावरणपूरक आराखडा तयार करणार - मुख्यमंत्री

Share This
मुंबई : महाराष्ट्रात दुष्काळासारखा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, पर्यावरणात मोठ्या प्रमाणात बदल होऊन त्याचे अनेक दुष्परिणाम होत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास हे या सर्वांचे मूळ कारण आहे. पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज बनली असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वैज्ञानिक पर्यावरणपूरक आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.

वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे 22 एप्रिल या जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वर्ल्ड ट्रेड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 20 व 21 एप्रिल या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील, अपर मुख्य सचिव मालिनी शंकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ.पी.अन्बलगन, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या संचालक रुपा नाईक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम पर्यावरण तज्ज्ञ होते. त्यांनी त्या काळात वनांचे संवर्धन, पर्यावरणाचे संतुलन यांचे महत्त्व सांगितले होते. पृथ्वी पाच तत्वांच्या आधारावर तयार झाली असून आपल्या जीवनामध्ये ही पाच तत्वे अंगभूत घटक म्हणून प्रत्येकाने स्वीकारली पाहिजेत. आज वाघांची संख्या कमी होत चालली आहे. त्याचे दुष्परिणाम पर्यावरण साखळीवर होत आहेत. त्यामुळे वाघांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, नद्या प्रदूषित झाल्या आहेत, त्या नद्यांना निर्मळ, जलप्रवाहित करण्यासाठी 14 प्रकारच्या योजनांचे एकत्रीकरण करुन जलयुक्त शिवारसारखी योजना राज्यात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी लवकरच वैज्ञानिक पर्यावरणपूरक आराखडा तयार करण्यात येणार असून अनेक वर्षांपर्यंत हा आराखडा मार्गदर्शक ठरेल. त्याचबरोबर विविध परवानग्यांसाठी शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासू नये यासाठी अनेक सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. त्या लवकरच मोबाईल ॲपवर उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले, पर्यावरणाचा ऱ्हास हा एका दिवसात झालेला नसून अनेक वर्षांपासून होत आला आहे. त्यामुळे आज अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या समस्येवर उपाययोजना म्हणून पर्यावरण विभागामार्फत पर्यावरणपूरक विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय परिषदेतून या आराखड्यासाठी पर्यावरण तज्ज्ञांकडून योग्य ते मार्गदर्शन मिळेल. तसेच जंगल तोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन माणसांचे आयुष्य कमी झाले आहे. सांडपाणी व्यवस्थापन, वृक्षारोपण करणे गरजेचे असून यासाठी कायमस्वरुपी योजना करणे आवश्यक आहेत, असेही कदम यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य पर्यावरण दक्षता केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’च्या माध्यमातून अनेक सेवा ऑनलाईन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन जागतिक वसुंधरा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. पर्यावरण मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात दोन कोटी वृक्षारोपण करुन त्याचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण मंत्री कदम यांचे अभिनंदन केले.

या परिषदेत वर्तमानातील पर्यावरणविषयक हवा, पाणी, माती, ध्वनीप्रदूषण या अनुषंगाने इतर महत्त्वपूर्ण बाबींवर या विषयातील तज्ज्ञ मान्यवरांना निमंत्रित करुन याबाबतचे प्रश्न आणि अंमलबजावणी केलेल्या शाश्वत उपाययोजनांवर व्यापक चर्चा होणार आहे. या चर्चेवरुन भविष्यातील समृद्ध हरित शाश्वत विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी मदत होणार आहे.

परिषदेला पूरक अशा प्रदूषण नियंत्रण विषयक आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या प्रदर्शनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री रामदास कदम, राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी सर्व स्टॉलला भेटी देऊन पाहणी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages