पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा - मुख्यमंत्री

Share This
मुंबई : पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी अधिकारी, बँकाच्या प्रतिनिधींना दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पंतप्रधान पीक विमा योजनेच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी कृषीमंत्री एकनाथ खडसे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा व्हावा म्हणून ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, बँकाचे प्रतिनिधी, कृषी अधिकारी, बचतगट, सामाजिक संस्था यांनी या योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी.

खडसे यांनी सांगितले, पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी ऑनलाईन तक्रार करु शकतो. तक्रारीनंतर तीन दिवसात विमा कंपनीचे प्रतिनिधी येऊन पाहणी करतील आणि तातडीने 25 टक्के रक्कम नुकसान भरपाई म्हणून देतील. उर्वरित रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल. पिकांवर कोणताही रोग आला तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असून शेतकऱ्यांना अधिक संरक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी कृषी विभागाच्या योजना राबविण्यासाठी मदत केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

ज्वारी, बाजरी, गहू, तूर, सोयाबीन, सूर्यफूल, कापूस, कांदा, ऊस, डाळिंब, द्राक्षे, शेंगदाणे, उडीद, हरभरा, मूग आदी पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. शेतातील पिकाला नैसर्गिक आग लागली, वीज कोसळली, चक्रीवादळाचा फटका बसला, पूर किंवा दरड कोसळून नुकसान झाले, दुष्काळ पडला, शेतात पाणी शिरले, कीड रोग झाला या कोणत्याही कारणामुळे पिकांचे नुकसान झाले तर शेतकरी विम्याचा दावा करु शकतो.

या पीक विमा योजनेच्या आढावा बैठकीत प्रारंभी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव डी.के.जैन यांनी सादरीकरण केले. प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पीक परिस्थितीचा अहवाल सादर केला. यावेळी कृषी आयुक्त विकास देशमुख, राज्यभरातून आलेले कृषी विभागाचे अधिकारी, नाबार्ड, राष्ट्रीयीकृत बँकाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages