लंडन ते महाड कार प्रवासाचा विश्वविक्रम करून डॉ. आंबेडकर यांना मानवंदना - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लंडन ते महाड कार प्रवासाचा विश्वविक्रम करून डॉ. आंबेडकर यांना मानवंदना

Share This
मुंबई - जगभर कार प्रवास करून मला विश्वविक्रम करायचा आहे. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे १२५ वे वर्ष आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना आणि महिलांना जे अधिकार दिले त्याची जाण ठेवून बाबासाहेब आंबेडकर यांना विश्वविक्रम करून मानवंदना देणार असल्याची माहिती भारुलता कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याचा पहिला सत्याग्रह केला. माझे पतीही महाडचे असल्याने लंडन ते महाड असा प्रवास करून विश्वविक्रमी प्रवासाची सांगता महाड येथे करणार असल्याचे भारुलता यांनी सांगितले   

भारुलता कांबळे इंग्लंडच्या नागरिक असल्या तरी त्या जन्माने गुजराती असून त्यांचे पती कोकणातील महाडचे आहेत. ड्रायव्हिंगचा शौक असलेल्या ४२ वर्षीय भारुलता गेले अनेक दिवस एकटया लाँग ड्राइव्ह प्रवासाचा विश्वविक्रम करण्याची तयारी करत आहे. त्याबाबत भारुलता यांनी गुरुवारी मुंबईच्या प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन आपल्या जागतिक प्रवासाची माहिती दिली.

‘लंडन ते महाड’ या कार सफरीवर भारुलता कांबळे ही मराठी महिला १६ जुलै रोजी निघणार अाहे. ७५ दिवसांत ती युरोप आणि आशियातील तब्बल २८ देशांचा प्रवास करणार आहे. २८ सप्टेंबर रोजी महाड या तिच्या कोकणातील गावी जेव्हा तिचा प्रवास संपवेल तेव्हा तिच्या नावे एकट्या महिलेने मोटारीने दोन खंडांचा लाँग ड्राइव्ह प्रवास करण्याचा विश्वविक्रम नोंदला जाणार आहे.

इंग्लंड, बेल्जियम, नाॅर्वे, फिनलंड, पोलंड, हंगेरी, स्वीडन, बेलारूस, रशिया, कझाकिस्तान, चीन, म्यानमार मार्गे भारतात महाराष्ट्रातील महाड पर्यंत प्रवास केला जाणार आहे. लंडन ते भारत या ७५ दिवसांच्या प्रवासात भारुलता कांबळे २८ देशांत जाणार आहे. या सफरीत त्यांचा एकूण प्रवास ३१ हजार किमी असून त्यातील ५ हजार ५०० किमी पर्वतरांगेतून, तर २ हजार ५०० किमी प्रवास वाळवंटातील असणार आहे. या प्रवासासाठी त्यांनी बीएमडब्ल्यू एक्स ३ या कारची निवड केली अाहे. विशेष म्हणजे या प्रवासात त्या एकटयाच असतील. या प्रवासात त्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेश देणार असल्याचे भारुलता कांबळे यांनी सांगितले.

ब्रिटीश महिलेचा विक्रम मोडणार 
या जागतिक विक्रमादरम्यान विक्टर ब्रुस या ब्रिटिश महिलेने १९२७ साली केलेला आर्टिक्ट सर्कलचा विक्रमही मोडणार असल्याचे भारुलता यांनी सांगितले. ब्रुसने तिच्या पतीसोबत ४०० किलोमीटरचा प्रवास करून हा विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र आर्टिक्ट सर्कलच्या जमिनीच्या शेवटच्या टोकापर्यंत जाणार असल्याने पुन्हा दुसरी कोणतीही महिला नव्याने प्रस्थापित होणारा विक्रम मोडू शकणार नाही, असा दावाही भारुलता यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages