स्थलांतरीत झालेल्या दुष्काळग्रस्तांना मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरता निवारा द्या - रविंद्र वायकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

स्थलांतरीत झालेल्या दुष्काळग्रस्तांना मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरता निवारा द्या - रविंद्र वायकर

Share This
मुंबई : प्रतिनिधी - मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळामुळे मुंबईत स्थलांतरीत होणार्‍यांचे प्रमाण वाढत असल्याने या जनतेला मुंबई महानगपालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरता निवारा देण्याची व्यवस्था करून दिलासा द्यावा, अशा सुचना गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना पत्राद्वारे दिल्या आहेत. 


महाराष्ट्रात यावर्षी मराठवाड्यात अनेक भागांसह लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला आहे. काही दिवसांपुर्वीच लातुर जिल्ह्यातील, देवणी तालुक्यातील काही गावांचा दुष्काळी पाहणी दौरा केला होता. या भागातील दुष्काळाची तीव्रता एवढी भीषण आहे की नाईलाजाने येथील जनतेला आपले घरदार सोडून मुंबईत स्थलांतरीत व्हावे लागत आहे. सद्या या भागांतील अनेक जनता घाटकोपर, भटवाडी येथील दत्ताजी साळवी मैदानात तात्पूरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या तंबूत वास्तव्य करीत आहेत. 

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित सुमारे १२०० च्या जवळपास शाळा आहेत. उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे या शाळा सद्यस्थितीत बंद आहेत. त्यामुळे लातूर, उस्मानाबाद तसेच अन्य दुष्काळग्रस्त जिल्ह्यातून मुंबईत स्थलांतरीत झालेल्या जनतेला या शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात निवारा उपलब्ध करून दिल्यास या दुष्काळग्रस्त भागातील जनतेला दिलास तर मिळेलच त्याचबरोबर महानगरपालिकेच्या शाळांधील मूलभूत व अन्य सुविधांचा देखील लाभ मिळेल, असे मतही वायकर यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे. त्यामुळे याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचनाही वायकर यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्राद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages