‘राजगृहाची निळी स्पंदने’ कार्यक्रमाने उलगडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनप्रवास - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

‘राजगृहाची निळी स्पंदने’ कार्यक्रमाने उलगडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनप्रवास

Share This
मुंबई, दि. 25 : बोरिवली येथील महापालिका मैदानात आयोजित ‘राजगृहाची निळी स्पंदने’ या कार्यक्रमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र रसिक प्रेक्षकांसमोर उलगडून दाखविले. हजारोच्या संख्येने उपस्थित रसिकजन यावेळी भीममय झाले होते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्याजयंती वर्षानिमित्त सामाजिक न्याय विभाग व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) यांच्या वतीने काल सायंकाळी हा कार्यक्रमआयोजित करण्यात आला होता. समता व सामाजिकन्याय वर्षानिमित्त राज्यभर राबविण्यात येत असलेल्या‘दूत समतेचा जागर महामानवाचा’ या कार्यक्रमाच्याश्रृंखलेअंतर्गत आयोजित या संगीतमय कार्यक्रमास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, खासदार गोपाळ शेट्टी, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार भाई गिरकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौर अलका केरकर, माजी महापौर शैलजा गिरकर, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त यशवंत मोरे, सहायक आयुक्त अविनाश देवसटवार, महापालिका उपायुक्त अशोक खैरे, सहायक आयुक्त साहेबराव गायकवाड, डॉ. इंदुलकर, श्रीकांत पांडे, अभया सोनवणे, नगरसेविका बीना जोशी, आसावरी पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

बोधी फाऊंडेशन आयोजित या कार्यक्रमात नाट्य, गीत, संगीताच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील ठळक घडामोडी मांडण्यात आल्या. डॉ. आंबेडकरांचे बालपण, त्यांचे शिक्षण, चवदार तळे सत्याग्रह, मनुस्मृती दहन, राज्यघटना निर्मितीतील त्यांचे योगदान आदी विविध घटना नाट्यरुपात रसिकांसमोर सादर करण्यात आल्या होत्या. संकल्पना व सादरीकरण ललित व अर्चना खोब्रागडे यांची होती.

यावेळी सामाजिक न्याय मंत्री बडोले म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तृत्व हिमालयाहून मोठे आहे. डॉ. आंबेडकर यांचे कार्य शब्दांत सांगण्याजोगे नाही. त्यांचे विचार व कार्ये समाजातील सर्वचस्तरापर्यंत पोहचणे काळाची गरज आहे. त्यामुळे सामाजिक न्याय विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर ‘दूत समतेचा जागर महामानवाचा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘राजगृहाची निळी स्पंदने’हा त्यांच्या जीवनावर आधारित नाट्य, गीत-संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. यावेळी गोपाळ शेट्टी यांनी मनोगत व्यक्त केले. गिरकर यांनी प्रास्ताविक केले. देवसटवार यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages