गोरेगाव पूर्व-पश्चिमेस जोडणारा मृणालताई गोरे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गोरेगाव पूर्व-पश्चिमेस जोडणारा मृणालताई गोरे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

Share This
मुंबई़, दि. ३० :  मुंबई महानगरीत रस्ता, उड्डाणपूल आणि वाहतुकीचे जाळे विणून अतिशय चांगली आणि सुगम्य मुंबई तयार करण्याचा राज्य शासनाचा संकल्प असून मुंबईसह महाराष्ट्राचे चित्र बदलवून दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.


गोरेगाव पूर्व-पश्चिमेस जोडणारा कै.मृणालताई गोरे उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या उड्डाणपूलाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यास उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, महापौर स्नेहल अंबेकर, खासदार गजानन किर्तीकर, गोपाळ शेट्टी, आमदार कपिल पाटील, सुनिल प्रभु, अमित साटम, भारती लव्हेकर, उपमहापौर अलका केरकर, महापालिका आयुक्त अजोय मेहता, नगरसेवक व नागरिक  उपस्थित होते.
            
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात वाहतूक व्यवस्था एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न असून बेस्ट, मोनो, मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे सुविधा हाकेच्या अंतरावर निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे. या माध्यमातून मुंबई आणि एमएमआर क्षेत्रामध्ये कुठल्याही भागापर्यंत नागरी वाहतूक व्यवस्थेचा वापर करून नागरिकांना पोहोचता येणार आहे. या सोबतच महानगरपालिका, एमएमआरडीए आणि राज्य शासन एकत्र येऊन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सिंगल तिकिट सुरू करण्याचा प्रयत्न असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एकाच तिकिटाचा वापर करून नागरिकांना प्रवास करता येईल. यासंदर्भात समग्र आराखडा तयार करून मुंबईतील सर्व वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
            
उपनगरीय रेल्वे ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. या उपनगरीय रेल्वेचा विकास व्हावा यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल आणि चर्चगेट ते विरार हा पूर्ण एलिव्हेटेड कॉरिडोर तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून पुढील ३-४ वर्षात उपनगरीय रेल्वेची प्रवासी वाहतुकीची क्षमता दुपटीने वाढेल. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या सामान्य माणसांचा प्रवास सुखकर होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
            
ते पुढे म्हणाले की, गोरेगाव पूर्व व पश्चिमेस जोडणारा कै.मृणालताई गोरे उड्डाणपुलामुळे नागरिकांना अतिशय चांगला मार्ग मिळाला असून त्यामुळे वाहतुकीची कोंडी दूर होणार आहे. या पुलाचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामांना गती द्यावी, अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिल्या.
            
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मुंबईच्या विकासात महत्त्वाची भूमिका असलेल्या कोस्टल रोडसाठी केंद्र शासनाकडून सर्व परवानग्या एका वर्षामध्ये मिळाल्या आहेत. या कामाला गती देण्याचा प्रयत्न असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. मुंबईमध्ये मेट्रोचे जाळे निर्माण करण्यासाठी अवघ्या दोन महिन्यात डीपीआर तयार करून ६ महिन्यात मेट्रो प्रकल्पाचा कार्य आदेश दिले गेले असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages