मुंबईची लाईफ असलेल्या बेस्टची प्रवाशीसंख्या गेल्या काही वर्षात लाखोने घटली आहे. एके काळी ४५ लाख प्रवासी बेस्टच्या बसेस मधून प्रवास करत होते. बेस्ट प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना भाजपाच्या कारभारामुळे आणि घेतलेल्या निर्णयांमुळे बेस्टमधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या २७ लाखावर आली आहे. ट्राफिक मुळे बेस्ट वेळेवर न येणे, खराब रस्ते यामुळे प्रवासी कमी झाल्याचे कारण देण्यात येत असले तरी गेल्या दोन ते तीन वर्षात तिकिटांची आणि त्या अनुषंगाने पासची दरवाढ करण्यात आली आहे.
बेस्टने कमी अंतरावर प्रवास करणारे प्रवासी मोठ्या प्रमाणात होते. यापैकी बेस्टची दरवाढ झाल्याने मेट्रो, शेअर रिक्षा, ट्याक्सी याकडे वळले आहेत. बेस्टच्या तिकिटाच्या दरात आणि बस कधी येईल याची वाट न बघता शेअर रिक्षा, ट्याक्सीने कमी त्रासाचा प्रवास करता येत असल्याने लाखो प्रवाश्यांनी शेअर रिक्षा, ट्याक्सीचा मार्ग पकडला आहे. बेस्टचा प्रवास करण्याचे सोडलेल्या प्रवाश्यांना पुन्हा बेस्टकडे वळवण्यासाठी हवे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. बेस्टने आपले उत्पन्न वाढवण्यासाठी केलेल्या दरवाढीने स्वतःची प्रवासी संख्या मात्र कमी करून घेतली आहे.
बेस्ट समितीच्या बैठकीत नेहमी सत्ताधारी शिवसेनेने दरवाढ करताना दरवाढ केली तरी आपले प्रवासी आपल्याकडेच राहतील अशी भूमिका घेतली आणि त्यातच बेस्टचा मोठा घात झाला आहे. स्वतः कधीही बेस्टने न फिरता आपल्या खाजगी गाड्यांमधून फिरणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी दरवाढ करताना आपण कोणत्या आणि कश्या प्रकारच्या सुविधा प्रवाशांना देतो, दरवाढ केली तर प्रवासी यामुळे खुश होतील का याचा सत्ताधारी म्हणून विचार करायला हवा होता. विरोधकांचा विरोध डावलत केलेली दरवाढ बेस्टच्या मुळाशी आली आहे.
बेस्ट समितीचे अध्यक्षपद शिवसेनेकडे असताना बेस्टमध्ये तिकिटांची दरवाढ झाली होती. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका २०१७ च्या सुरुवातीला होत आहेत. या निवडणुका डोळ्या समोर ठेवून बेस्ट समिती भाजपाकडे देण्यात आली आहे. भाजपाचे मोहन मिठबावकर यांनी आपल्या पहिल्याच बेस्ट समिती बैठकी नंतर पत्रकारांशी चर्चा करताना बेस्टचे प्रवासी वाढवण्यासाठी कमी अंतराचे भाडे कमी करण्याचे संकेत दिले होते. त्याला बेस्टच्या महाव्यवस्थापकानीही दुजोरा दिला होता.
बेस्टने दरवाढ कमी केल्याचे जाहीर केले. बेस्टने दरवाढ कमी केल्याचे जाहीर केले असले तरी कमी अंतराचे भाडे कमी करण्यात आलेले नाही. कमी अंतराचे भाडे कमी न करता बस मार्गांमध्ये नवे टप्प्यांचा समावेश करुन भाडे कमी केल्याचे बेस्ट उपक्रमाने भासविले आहे़. २ ते १० किलोमिटरचे भाडे कमी करण्यात आलेले नाही. १० किलोमीटर ( १८ रुपये) नंतर १४ किलोमीटरचा (२६ रुपये) टप्पा होता यामध्ये नव्याने १२ किलोमीटरचा (२२ रुपयांचा), १४ ते २० किलोमीटर ( २६ रुपये) मध्ये १७ किलोमीटरचा (२४ रुपये), असे २५, ३५ आणि ४५ किलोमीटरचे टप्पे टाकून दरवाढ कमी केल्याचे भासवले आहे. मासिक व त्रैमासिक बस पास आणि वातानुकूलित बस भाड्यात कपात करुन प्रवाशांना दिलासा देण्यात आला आहे़.
बसभाड्यांमध्ये कपात केल्या नंतर दररोज बेस्ट उपक्रमाच्या उत्पन्नात चार लाख ६१ हजार रुपयांची घट होणार आहे़ त्यामुळे या बसगाड्यांचे दररोज २२ हजार ३३५ प्रवासी वाढविणे आवश्यक आहे़ बस पासमध्ये ३० दिवसांऐवजी २२ दिवसांचे पैसे प्रवाशांकडून घेण्यात येणार आहेत़ तर त्रैमासिक पास ९० ऐवजी ६६ दिवसांचा असणार आहे़ मासिक व त्रैमासिक बसगाड्यांच्या भाड्यात कपात केल्यामुळे दररोज चार लाख ८१ हजार रुपयांचे उत्पन्न घटणार आहे़ त्यामुळे या मार्गावर दररोज ५५५ जादा प्रवाशी मिळण्याची गरज आहे़ . वातानुकूलित बसगाड्यांचा दैनंदिन पास दोनशे रुपयांऐवजी दीडशे रुपये, मासिक बसपास ४८०० वरुन ३३०० रुपये तर त्रैमासिक पास ९९०० रुपयांचा असणार आहे़ या भाडेकपातीमुळे एक लाख ६० हजार रुपये उत्पन्न घटणार आहे़ त्यामुळे वातानुकूलित बसगाड्यांचे आणखी २४०० प्रवाशी वाढविण्याची गरज असल्याची आकडेवारी आहे.
यावरून बेस्ट प्रशासन आणि सत्ताधारी विचार न करता निर्णय घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपाचे अध्यक्ष बेस्ट समितीवर आल्यावर त्यांनी कमी अंतराचे भाडे कमी करण्याची केलेली घोषणा हवेतच विरून गेली आहे.कमी अंतराचे आणि फिडर रूट वरील भाडे कमी न केल्याने या मार्गावरील लाखो प्रवासी आजही बेस्टपासून दूर आहेत. या लाखो प्रवाशांना पुन्हा बेस्टकडे वळवण्यासाठी ज्या मार्गावर शेअर रिक्षा आणि ट्याक्सी चालतात त्या ठिकाणी पॉइंट टू पॉइंट बस चालवल्या जाणार होत्या तेही अद्याप बेस्टला शक्य झालेले नाही.
बेस्टने नुसत्या घोषणा केल्या. परंतू त्याची अमलबजावणी मात्र केलेली नाही. लाखो प्रवाश्यांना आपल्याकडे वळवण्याची संधी बेस्टने आणि सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाने गमावली आहे. बेस्टचे भाडे वाढ कमी करतानाही काँग्रेसच्या सदस्यांनी कमी अंतराचे भाडे कमी करण्याची सूचना मांडली होती. त्यावर सर्वच पक्षातील सदस्यांचे एक मत होते, परंतू भाडे वाढ कमी करण्यासाठीच्या प्रस्तावावर जेव्हा मतदानाची वेळ आली तेव्हा मात्र भाजपा आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षांनी काँग्रेसची सूचना अमान्य करत प्रशासनाचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
सामान्य आणि कमी अंतराच्या प्रवाश्यांची प्रशासन आणि सत्ताधार्यांना काहीही काळजी नसल्याचे दिसून येते. अशी काळजी असती तर त्यांनी नक्कीच दरवाढ कमी करून प्रवाश्यांना दिलासा देत शेअर रिक्षा आणि ट्याक्सीचे प्रवासी आपल्याकडे वळविले असते. यामुळे बेस्टचे प्रवासी वाढण्याबरोबरच बेस्टचे उत्पन्नही वाढले असते. परंतू असे करण्यात प्रशासन आणि सत्ताधार्यांना अपयश आल्याने बेस्टसाठी हि शोकांतिकाच म्हणावी लागेल. राज्यात आणि केंद्रात अच्छे दिन आने वाले है असा विश्वास देत भाजपाचे सरकार सत्तेत आले आहे. परंतू हि स्वप्न पूर्ण झालेली नाहीत. बेस्ट मध्येही अध्यक्ष पद स्विकारल्यावर मोहन मिठबावकर यांनी अशीच स्वप्न दाखवली. यामुळे भारतीय नागरिकांप्रमाणेच बेस्टच्या प्रवासी आणि मुंबईकरांकडून बेस्टला अच्छे दिन येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३

No comments:
Post a Comment