नालेसफाईसाठी उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांच्या शनिवार, रविवार सह सर्व सुट्या रद्द - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नालेसफाईसाठी उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांच्या शनिवार, रविवार सह सर्व सुट्या रद्द

Share This
मुंबई / प्रतिनिधी 23 May 2016
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईची सर्व कामे ही ठरलेल्या वेळापत्रकानुसार व सुयोग्यप्रकारे पूर्ण व्हावीत यासाठी सर्व परिमंडळीय उपायुक्त व विभागीय सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सुरु असलेल्या नालेसफाई कामांची पाहणी अधिक तीव्रतेने करावी, तसेच सर्व संबंधित उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांनी पुढील आदेश मिळेपर्यंत रजा घेऊ नये व शनिवार – रविवारी देखील कार्यरत रहावे, असे आदेश महापालिका आयुक्त  अजोय मेहता यांनी दिले आहेत. तसेच येत्या गुरुवारपासून महापालिका आयुक्त अचानक भेटी देऊन नालेसफाई कामांची पाहणी करणार असल्याचेही या बैठकीत निर्देशित करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात आज संपन्न झालेल्या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख यांच्यासह सर्व संबंधित उपायुक्त व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. या बैठकी दरम्यान नालेसफाई विषयक विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. छोट्या नाले, गटारी इत्यादी मधून काढलेल्या गाळाचे लहान-लहान ढिग न करता रस्त्याच्या शेवटी एका ठिकाणी हा गाळ गोळा करावा; तसेच हे काम येत्या बुधवार पर्यंत पूर्ण करावे असेही आदेश या बैठकीदरम्यान देण्यात आले

नालेसफाईच्या कार्यवाहीबाबत सर्व संबंधित उपायुक्तांनी व सहाय्यक आयुक्त यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील नाल्यांमधील प्रवाहास अडथळा येणार नाही आणि पाण्याचा निचरा योग्यप्रकारे व्हावा, यासाठी नाल्यांमधील गाळ, कचरा, बांधकाम कचरा (Debris), दगड यासारख्या बाबी हटविण्याची कार्यवाही संबंधितांकडून करवून घ्यावी. तसेच यासाठी पर्जन्य जल वाहिन्या (SWD), घनकचरा व्यवस्थापन (SWM), मलनि:सारण प्रचालने (SO) आदि खात्यांना सहभागी करुन ही कामे पूर्ण करावी, असेही आदेश आजच्या बैठकीदरम्यान देण्यात आले आहेत

परिमंडळीय उपायुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्रातील नालेसफाई कामांची पाहणी नियमितपणे करावी व आढावा घ्यावा, नालेसफाई बाबत येत्या गुरुवार पासून म्हणजेच २६ मे २०१६ पासून महापालिका आयुक्त हे स्वत: महापालिका क्षेत्रात सुरु असलेल्या नालेसफाई कामांची पाहणी अचानक भेटी देऊन करणार असल्याचेही या बैठकीदरम्यान सूचित करण्यात आले आहे. सर्व उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांनी पुढील आदेश मिळेपर्यंत रजा घेऊ नये, तसेच शनिवारी व रविवारी देखील कार्यरत रहावे, असेही आदेश बैठकीदरम्यान महापालिका आयुक्तांनी दिले आहेत

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages