पावसाळ्यात हिंदमाता परिसरात पाणी तुंबणार नाही - शिवसेनेचा दावा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पावसाळ्यात हिंदमाता परिसरात पाणी तुंबणार नाही - शिवसेनेचा दावा

Share This
मुंबई - दरवर्षीप्रमाणे यंदा पावसाळ्यात हिंदमाता परिसरात पाणी तुंबणार नाही, असा दावा सोमवारी शिवसेनेने केला. रे रोड येथील पंपिंग स्टेशनच्या पंपाची प्रायोगिक चाचणी करण्यात आल्यानंतर शिवसेनेने हा दावा केला आहे. या पंपिंग स्टेशनमुळे भरती असतानाही समुद्रात पावसाचे पाणी सोडणे शक्‍य होणार आहे. समुद्राला भरती असताना सखल भागांत जास्तीत जास्त अर्धा फूट पाणी साचण्याची शक्‍यता आहे, असे सांगण्यात आले. 
हिंदमाता जंक्‍शनपासून थेट लालबागपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर अनेक ठिकाणी दरवर्षी कमरेइतके पाणी तुंबते. यावर उपाय म्हणून "ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्पा‘अंतर्गत महापालिकेने रे रोड येथे उच्च क्षमतेचे पंपिंग स्टेशन उभारण्याचे काम हाती घेतले होते. हे काम अंतिम टप्प्यात असून जूनपासून त्याचा वापर करणे शक्‍य होईल. या पंपिंग स्टेशनची महापालिकेतील सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव आणि स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी पाहणी करून पंपाची चाचणीही घेतली. या प्रकल्पासाठी तब्बल 106 कोटींचा खर्च आला आहे. या जमिनीच्या वापरासाठी महापालिका दर महिन्याला एक लाखाचे भाडे मुंबई पोर्ट ट्रस्टला देत आहे. 

या पंपिंग स्टेशनमध्ये उच्च क्षमतेचे सहा पंप बसवण्यात आले आहेत. त्यामुळे दर सेकंदाला 36 हजार लिटर पाण्याचा उपसा करणे शक्‍य होईल. उच्च क्षमतेच्या पंपामुळे समुद्राला भरती आलेली असतानाही पावसाचे पाणी समुद्रात सोडणे शक्‍य होणार आहे. ज्या ठिकाणी चार ते पाच फूट पाणी साचत होते, तिथे यापुढे फक्त सहा इंचांपर्यंत पाणी साचेल, असा दावा विश्‍वासराव यांनी केला. 

हिंदमाता परिसरासह परळपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, मडकेबुवा चौक, आचार्य दोंदे मार्ग, बॅ. नाथ पै मार्ग, अभ्युदयनगर, काळाचौकी, दत्ताराम लाड मार्ग, पेटीट लेन, लालबाग, भायखळा पूर्व या भागांना दिलासा मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages