मुंबई, दि. 9 : ‘नीट’बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व शक्यता राज्य शासन तपासत आहे. दि. 1 मे 2016 रोजी ज्या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती, त्यांना दि. 24 जुलै 2016 रोजी पुन्हा परीक्षेला बसता येईल ही निकालपत्रातील बाब समाधानाची असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. ‘नीट’बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत तावडे बोलत होते.
नीट परीक्षेचा दुसरा टप्पा दि. 24 जुलै 2016 रोजी होणार आहे. यासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना साधारणपणे 70 दिवसांचा अवधी मिळणार आहे. नीट परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबत मनुष्यबळ विकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी तसेच केंद्र शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु आहे. सदरचा अभ्यासक्रम हा देशातील बहुतांश राज्यातील बोर्डांच्या कमीत कमी अभ्यासक्रमांशी सुसंगत असावा असे प्रयत्न करण्यात येत आहेत. नीटच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उपलब्ध कालावधीदरम्यान संबंधित शाळा,महाविद्यालयामध्ये नीटच्या परीक्षेची तयारी करुन घेण्यासाठी राज्य शासनातर्फे विशेष वर्ग घेण्यावर विचार केला जाईल. यासाठी उद्या शिक्षणतज्ज्ञ व शिक्षण विभागाचे अधिकारी यांची तातडीची बैठक बोलाविण्यात येणार असल्याचेही तावडे यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयामध्ये देशातील आठ राज्यांचे वकील बाजू मांडण्यासाठी उभे होते. यांच्याबरोबर त्या त्या राज्यांतील अधिकारीही आले होते. तथापि, महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तावडे व्यक्तिशः हजर होते. राज्य शासनाने सदर याचिकेदरम्यान नीट परीक्षा ही सन 2018 पासून लागू करावी अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात केली होती. नीट परीक्षा ही 2016 पासून लागू केल्यास राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, अशी भूमिकाही शासनाने न्यायालयात घेतली होती.


No comments:
Post a Comment