मध्यवर्ती स्वयंपाकगृहाची योजना सर्व आदिवासी आश्रमशाळांत राबविणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मध्यवर्ती स्वयंपाकगृहाची योजना सर्व आदिवासी आश्रमशाळांत राबविणार

Share This
मुंबई, दि. 6 : आदिवासी विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळण्यासाठी शासनाने मध्यवर्ती स्वयंपाकगृह ही योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता व प्रकृती विकसित करण्यासाठी लाभ झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही योजना टप्प्या-टप्प्याने सर्व आदिवासी आश्रम शाळांमध्ये राबविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम या संस्थेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘नीती दृष्टीपत्र 2015’ या पुस्तकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, आदिवासी विद्यार्थ्यांना समाजातील इतर घटकांसोबत शिक्षणाची संधी मिळावी यासाठी शासनाने 32 हजार विद्यार्थ्यांना नामांकित संस्थांमध्ये प्रवेश दिला असून येत्या शैक्षणिक वर्षापासून त्यामध्ये 30 हजार विद्यार्थ्यांची वाढ अपेक्षित आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च शासन करणार असून आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या गुण व क्षमतांचा विकास करुन त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे धोरण शासनाने आखले आहे.

‘नीती दृष्टीपत्र 2015’ मध्ये आरोग्य, शिक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रांतील बाबींचा आढावा घेऊन या पुस्तकाची आखणी केली आहे. या पुस्तकाद्वारे गैरशासकीय संघटनेने सर्वात महत्त्वाचा अभ्यास केलेला असून पुस्तकातील सूचनांचा शासन सकारात्मक विचार करेल, असेही यावेळी श्री. फडणवीस यांनी सांगितले.

आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी यावेळी आपले विचार मांडताना सांगितले की, शासन आदिवासी विकासाबाबत व त्यांच्या न्याय्य हक्कांबाबत सकारात्मक असून ‘पेसा’ कायद्यांतर्गत 5 टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात आला आहे. यामुळे आदिवासी विकासाला चालना मिळेल. तसेच गरोदर आदिवासी मातांना डॉ.अब्दुल कलाम योजनेमार्फत सकस आहार मिळाल्यामुळे कुपोषणाच्या समस्येला आळा बसेल. आदिवासी समाजासाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी शासनासोबत काम करुन समाजाच्या प्रगतीला हातभार लावावा. ‘नीती दृष्टीपत्र 2015’ मध्ये विविध क्षेत्रांचा घेतलेला आढावा महत्त्वाचा असून त्यावर शासन सकारात्मक विचार करेल, असेही सवरा यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव अत्राम, अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लक्ष्मणराव टोपले व संस्थेचे विष्णूकांत तसेच आदिवासी बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages