मुंबई, दि. 6 : राज्य शासनामार्फत 5 मे रोजी वैद्यकीय व दंत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेली सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) ग्राह्य धरण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सकारात्मक संकेत दिले आहेत. यासंबंधीच्या याचिकेबाबतची पुढील सुनावणी 9 मे 2016 रोजी होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्रासह विविध राज्यांत वैद्यकीय व दंतवैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणा-या सामाईक प्रवेश परिक्षे(सीईटी) ला तात्पुरती सवलत देण्याचे सूचक मत शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाच्यावतीने यावर्षी घेण्यात आलेल्या सीईटी नुसार प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा होऊ शकतो. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तावडे बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे उपस्थित होते.
तावडे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाची सामाईक प्रवेश परिक्षा (सीईटी) ही कायद्यानुसार वैध असल्याने राज्याला राष्ट्रीय पात्रता-प्रवेश परिक्षा (‘नीट’)मधून सवलत देण्यात यावी,अशी बाजू सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाच्या वतीने मांडण्यात आली. याबाबतच्या याचिकेवर दि. 2 मे रोजी सुनावणी झाली. परंतु, सदरची सुनावणी अपूर्ण राहिल्यामुळे पुनश्च 5 मे रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. या दिवशीसुध्दा सदरची सुनावणी अपूर्ण राहिल्यामुळे ती आज दुपारी तीन वाजता झाली. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाच्या सीईटीबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे संकेत दिले असून याबाबतचे निकालपत्र सोमवार दि. 9 मे रोजी जाहीर करण्यात येईल, असे सांगितले.
तावडे पुढे म्हणाले की, राज्य शासनाच्या कोट्यातील 85 टक्के जागा म्हणजेच एमबीबीएसच्या 2810 जागा भरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सकारात्मक विचार करण्याचे संकेत यावेळी दिले आहेत. अंतिम निकाल सोमवार दि. 9 मे रोजी लागेल व राज्याची 5 मे रोजी घेण्यात आलेली सीईटी ग्राह्य धरण्यात येईल, अशी आशा तावडे यांनी यावेळी व्यक्त केली.

No comments:
Post a Comment