मुंबई - मुंबईमध्ये होणाऱ्या बेकायदेशीर बांधकामासाठी संबंधित विभागातील सहाय्यक आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल असे स्पष्ट आदेश असताना या आदेशांची अमलबजावणी केली जात नव्हती. यामुळे मुंबई मध्ये बेकायदा बांधकामे मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहेत. बेकायदा बांधकामांवर स्थानिक सहाय्यक आयुक्त कारवाई करत नसल्याच्या तक्रारी आयुक्तांपर्यंत मोठ्या प्रमाणात येत असल्याने आयुक्तांनी आता मुंबई महापालिका कायद्यानुसार अशा बांधकामांबाबत सहायक आयुक्तांना जबाबदार धरण्याचा इशारा दिला आहे.
मुंबईत बेकायदा फेरीवाले, झोपड्या आहेतच. तसेच, अनेक इमारतीही बेकायदा आहेत. काही इमारतींवर बेकायदा मजले बांधण्यात आले आहेत. विशेषकरून दक्षिण मुंबईत जुन्या इमारतींच्या दुरुस्तीची परवानगी घेऊन बेकायदा इमारत पाडून पालिकेची परवानगी न घेताच नवी इमारत उभी केली जाते. असे प्रकार कामाठीपुरा, महंमद अली मार्ग, मशिद बंदर, सॅंडहर्स्ट रस्ता परिसरात घडत असल्याचे आढळून आले आहे. याबाबात थेट आयुक्त अजोय मेहता यांच्याकडेही लेखी तक्रारी आल्या आहेत. त्यांची दखल घेऊन प्रभागातील सहायक आयुक्तांनी त्यांच्या प्रभागातील बेकायदा बांधकामावर लक्ष ठेवून कारवाई करावी, असा आदेश मेहता यांनी दिला आहेत. कारवाई न केल्यास अशा बेकायदा बांधकामांना सहायक आयुक्तांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. बेकायदा बांधकामांसह रस्ते आणि पदपथावरील अतिक्रमण हटवण्याचा आदेशही आयुक्तांनी दिला आहे. खासकरून पदपथावरील व्यावसायिक गाळ्यांवर व रस्त्यावरील सरबत आणि बर्फाच्या गोळ्याच्या गाड्यांवर कारवाईचा आदेश दिला आहे.

No comments:
Post a Comment