मुंबई 2 मे 2016 - मुंबईमधील बेस्टचे ५२ मार्ग बंद केल्याने सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक होत बेस्ट भवनावर मोर्चा काढून महाव्यवस्थापकांना घेराव घातला. यावेळी बंद केलेले ५२ बस मार्ग पुन्हा सुरु करण्याची मागणी करण्यात आली असता महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी तीन दिवसात मार्ग सुरु करू असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येत आहे.
नगरसेवकांना विश्वासात न घेता तडकाफडकी बस बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतलं आहे. बंद करण्यात आलेले मार्ग बहुतेक करून शिवसेना नगरसेवकांच्या विभागातील तर काही मार्ग शिवसेनेच्या नगरसेवकांच्या मागणीवरून सुरु करण्यात आलेले आहेत. बेस्ट समिती यावर्षी शिवसेनेने आपला मित्र पक्ष भाजपाच्या ताब्यात देताच बेस्टचे ५२ मार्ग बंद केल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे नगरसेवकांनी आपल्या मागण्या बेस्ट महाव्यवस्थापकांसमोर मांडल्या आहेत. त्यानंतरही त्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर, उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान बंद केलेल्या मार्गावरील बसेस तोटयात होत्या. प्रवाश्यांच्या मागणी नुसार हे रद्द केलेले मार्ग पुन्हा टप्या टप्याने सुरु केल्या जाणार असून पुढील चार महिने या मार्गाचा आढावा घेवून योग्य निर्णय घेतला जाईल अशी माहिती बेस्ट प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment