शिवसेनेचा सुटलेला संयम हे त्यांच्या अविवेकाचे द्योतक - श्वेता शालिनी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शिवसेनेचा सुटलेला संयम हे त्यांच्या अविवेकाचे द्योतक - श्वेता शालिनी

Share This
मुंबई : राजकारण हा जसा अनिश्चिततेचा खेळ आहे तसेच परिवर्तनाचेही क्षेत्र राजकारण हे आहे. राजकीय आघाड्या वा युत्यांचा निर्णय दोन्ही पक्षातील परस्पर संवादावर अवलंबून असतो. मात्रहे राजकीय सत्य विसरलेल्या शिवसेनेला भाजपाद्वेषाची गरळ ओकण्यातच धन्यता वाटते. सरकारमध्ये राहून मित्र पक्षाला पाण्यात पाहणार्या शिवसेनेला एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यामुळे झालेल्या असुरी आनंदाचे हिडीस प्रदर्शन महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला अशोभनीय असल्याची प्रतिक्रीया भाजपाच्या प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी केली. खडसे प्रकरणाच्या निनित्ताने शिवसेनेचा सुटलेला संयम हे त्यांच्या अविवेकाचे द्योतक असल्याचा टोला ही श्वेता शालिनी यांनी लगावला.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आपल्यावर झालेल्या आरोपांमधून निर्दोष सिध्द होईपर्यंत मंत्री पदाचा त्याग करण्याची आपली भूमिका खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील निवृत्त न्यायधिशांद्वारे या आरोपांची चौकशी करण्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर सरकार मधिल भागीदार असलेल्या शिवसेनेने अतिशय जबाबदारीने प्रतिक्रीया देणे अपेक्षित होते. परंतु, शिवसेना राजकीय आकसाला बळी पडल्याचा आरोप श्वेता शालिनी यांनी केला. खडसेंच्या राजीनाम्यानंतर जळगावात शिवसेना कार्यकर्त्यांनी पेढे वाटून व फटाके फोडून आपला असुरी आनंद व्यक्त केला. एवढ्यावर तरी शिवसेना थांबेल असे वाटले होते. मात्र सामना मधून अग्रलेख लिहून त्यांनी भाजपाद्वेषाची गरळ ओकलीच. यावरून  खडसेंबद्दलचा वैयक्तीक आकस व भाजपचा मत्सर हीच शिवसेनेची अधिकृत भूमिका असल्याचे सिध्द होते. विधानसभा निवडणूकीपूर्वी दोन्ही पक्षात युती न होणे हा तत्कालिन परिस्थितीवर आधारीत निर्णय होता. नंतर मंत्रीमंडळाच्या रचनेत सेनेला सामावून घेत भाजपाने ही दरी मिटवण्याचा आपल्या परीने प्रयत्न केल्याचा दावाही श्वेता शालिनी यांनी केला. राजकीय वाटचालीत अनेक चढ उतार येतच असतात परंतु,त्याचा पूर्वाग्रह न बाळगता स्वच्छ दृष्टीने  लोकहीताचे राजकारण करणे हाच राजकारणाचा स्थायी भाव असल्याचे मत श्वेता शालिनी यांनी व्यक्त केले. त्यामुळे शिवसेनेने हा विवेक बाळगून शालिनतेचे राजकारण करावे आणि भाजपाद्वेषाची गरळ ओकणे थांबवावे अन्यथा स्वत:चेच विषारी बुडबुडे फुटतांना पाहण्याचे दूर्भाग्य शिवसेनेच्याही वाट्याला येऊ शकते असा इशारा श्वेता शालिनी यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages