१०० शिडाच्या नौकांनी उजळणार जुहू चौपाटी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 June 2016

१०० शिडाच्या नौकांनी उजळणार जुहू चौपाटी

गोबो प्रोजेक्टर्सच्या माध्यमातून दिले जाणार संदेश
जुहू चौपाटीच्या प्रस्तावित सुशोभिकरणाची कार्यवाही प्रगती पथावर
मुंबई / प्रतिनिधी
मुंबईचे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ व आकर्षण म्हणजे जुहू चौपाटी ! जगभरातून येणारे पर्यटकच नाही, तर हजारो मुंबईकर देखील मुला-बाळांसह काही विरंगुळ्याचे क्षण मिळावे म्हणून या जुहू चौपाटीवर येत असतात. या जुहू चौपाटीच्या सुशोभिकरणाची कार्यवाही बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनात आता प्रगतीपथावर आहे. यानुसार लवकरच जुहू चौपाटी ही अत्याधुनिक व बदलती रंगसंगती असणा-या दिव्यांनी उजळणार आहे. विशेष म्हणजे हे दिवे शिडाच्या नौकेच्या प्रारुपात (Model) बसविण्यात येणार असल्याने भविष्यात हे जुहू चौपाटीचे विशेष आकर्षण ठरेल, अशी माहिती महापालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता जयंत बनसोड यांनी दिली आहे.


या प्रस्तावित सुशोभिकरणांतर्गत जुहू चौपाटीवरती १२ मीटर उंचीचे वैशिष्ट्यपूर्ण असे १०० खांब बसविण्यात येणार आहेत. या प्रत्येक खांबावर `टेन्साईल फॅब्रिक' पासून तयार केलेल्या शिडाच्या नौकेची प्रारुपे बसविण्यात येणार आहे. या शिडाच्या नौकेच्या खालच्या बाजूने ४ दिवे असणार आहेत. तर समुद्राच्या भरतीच्या पाण्यावर व चौपाटीच्या वाळूवर प्रकाशाच्या सहाय्याने सामाजिक संदेश देता यावेत, यासाठी या खांबावरती 'गोबो प्रोजेक्टर्स' देखील असणार आहेत. या सर्व बाबींमुळे जुहू चौपाटीचे रुपडे खुलण्यासोबतच जुहू चौपाटीवरची संध्याकाळ अधिक रमणीय व मनमोहक होणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरु झालेली असून येत्या ११ जुलै पर्यंत ही निविदा भरता येणार आहे.

जुहू चौपाटीच्या प्रस्तावित सुशोभिकरणाबाबत ठळक मुद्दे
> जुहू चौपाटीवर ४.५ किलोमीटर लांबीच्या चौपाटीच्या सौंदर्यीकरणाचा भाग म्हणून चौपाटीवर उत्कृष्ट प्रकारच्या गंजरोधक रंगाने रंगविलेले (पी.यू. पेंटेड) १२ मीटर उंचीचे १०० खांब निश्चित अंतराने बसविण्यात येणार आहेत
> प्रत्येक खांबावर ४.५ मीटर उंचीवरती टेन्साईल फॅब्रिक पासून तयार केलेल्या शिडाच्या नौकेचे प्रारुप (Model) बसविण्यात येणार आहे.
> या प्रत्येक नौकेच्या / होडीच्या (Sail Boat) खालच्या बाजूने मंद प्रकाश देणारे व बदलते रंग असणारे ४ दिवे बसविण्यात येणार आहेत. होडीच्या शिडामध्ये देखील मंद प्रकाश असणारे बदलत्या रंगाचे दिवे बसविण्यात येणार आहेत.
> खांबावरती गोबो प्रोजेक्टर्स बसविण्यात येणार आहेत. या गोबो प्रोजेक्टर्सद्वारे समुद्राच्या भरतीच्या पाण्यावर वा चौपाटीच्या वाळूवर गरजेनुसार सामाजिक संदेश देणे शक्य होणार आहे
> जुहू चौपाटीवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व त्या भोवतालचा परिसरात आकर्षक व अत्याधुनिक स्वरुपाची विद्युत रोषणाई करण्यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे
> या खांबांचा व शिडाच्या नौकेचा आकार हा चौपाटीवरच्या हवेच्या वेगाला अनुरुप असणार आहे.
> नौकेच्या खाली बसविण्यात येणारे व शिडातील सर्व दिवे हे एलईडी दिवे असणार आहेत.
> जुहू चौपाटीवरील पोलीस चौकीजवळ विद्युत रोषणाईने प्रकाशमान होणारे व रंग बदलणारे 'मिडिया ट्री' देखील या सुशोभिकरणांतर्गत बसविण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad