मुंबई, दि. 2 : राज्याच्या प्रगतीला अधिक गती देणाऱ्या ‘मुंबई-नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे’ प्रकल्पासह ‘सर्वांसाठी घरे’ आणि पोलीसांसाठींच्या घरांच्या प्रकल्पात सहभागी होण्यास मलेशियन कंपन्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उत्सुकता दाखविली.
सह्याद्री अतिथीगृह येथे मलेशियन कंपनी सीआयडीबी होर्डिंगचे चेअरमन दातो यांच्या नेतृत्वाखाली विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी खासदार पूनम महाजन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धिवसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात जनतेला पायाभूत सुविधा पुरविणारे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प सुरु करण्यात येत असून या प्रकल्पांमध्ये विदेशातील अनेक कंपन्यांनी गुंतवणूक करण्यास उत्सुकता दाखविलेली आहे. ‘मुंबई-नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे’ या प्रकल्पामुळे राज्याचा चेहरामोहरा बदलणार असून हा प्रकल्प देशातील सर्वात मोठा आर्थिक कॉरिडॉर असणार आहे. या ‘एक्सप्रेस वे’ चा फायदा राज्यातील22 जिल्ह्यांना होणार असून या मार्गावरील शहरे विकसित होणार आहे. यामुळे या प्रकल्पात गुंतवणूक करण्याची विविध कंपन्यांना मोठी संधी निर्माण होणार आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांमध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्यांना राज्य शासन सर्वोतोपरी मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिष्टमंडळास दिली.
मलेशियातील अलोय एमटीडी, डीएमआयए ग्रुप, इव्हरसेंदाई यासारख्या विविध कंपन्यांनी मुंबई-नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे, सर्वांसाठी घरे, पोलीसांसाठी घरे या प्रकल्पांमध्ये काम करण्यास उत्सुक असल्याचे संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
No comments:
Post a Comment