कोकण विभागात प्रथमच ‘शाळेसाठी एक दिवस’ नाविन्यपूर्ण उपक्रम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कोकण विभागात प्रथमच ‘शाळेसाठी एक दिवस’ नाविन्यपूर्ण उपक्रम

Share This
मुंबई, दि. 5 : कोकण विभागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम प्रथमच नव्याने सुरु करण्यात येत असून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व अधिकारी महिन्यातील एक दिवस शाळेसाठी देणार आहेत. या उपक्रमाचा उद्देश शाळा तपासणी करणे नसून शिक्षण मोहिमेस पूरक आधार देणे असा आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त, कोकण विभाग प्रभाकर देशमुख यांनी पत्रकारांना दिली.


‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांबद्दल आस्था निर्माण करणे, विद्यार्थ्यांना आदर्श व्यक्तिमत्त्वाचे अनुकरण करणे, शाळेतील गरजा, उल्लेखनीय बाबी, शिक्षणाचे महत्त्व, गुणवत्तापूर्ण शिक्षण हा असणार आहे. एक दिवस शाळेसाठी याचा पहिला टप्पा दि. 7 जुलै, 21 जुलै, 18 ऑगस्ट, दुसरा टप्पा दि. 20 सप्टेंबर, 22 ऑक्टोबर, 17 नोव्हेंबर, 2016 आणि त्यानंतर तिसरा टप्पा दि. 15 डिसेंबर, 2016, दि. 19 जानेवारी, 2017, दि. 16 फेब्रुवारी, 2017 असा असणार आहे. कोकण विभागात 10,586 प्राथमिक शाळा आहेत. यासाठी 3000 अधिकारी सहभागी होतील, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
            
या उपक्रमांतर्गत अधिकारी शाळेच्या परिपाठ अंतर्गत राष्ट्रगीत, दिनविशेष यासाठी विद्यार्थ्यांसह सहभागी होतील. एका वर्गावर पाठ घेतील. शालेय पोषण आहार सेवन करतील. यात सर्व विभागाचे वर्ग-1, वर्ग-2, वर्ग-3 चे अधिकारी सहभागी होतील. हा उपक्रम म्हणजे शाळेची तपासणी नसून शाळेसाठी शिक्षण मोहिमेस पुरक आधार देणे, हा आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी मा.मंत्री महोदय, मा.पालकमंत्री, सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, लोकप्रतिनिधी यांना विनंती करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
            
या कार्यक्रमाचे नियोजन शिक्षण अधिकारी प्राथमिक हे करणार असून जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी एक पाहणी तक्ता तयार करण्यात आला आहे. त्यात बौद्धिक सुविधांचा दर्जा, खेळांच्या सुविधा, शाळेतील विविध उपक्रम, शालेय स्वच्छता, स्वच्छतेच्या सवयी, शालेय पोषण आहार, ई-लर्निंग, विद्यार्थ्यांची शालेय प्रगती आदींबाबत  ‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमांतर्गत माहिती करुन देण्यात येणार आहे. कोकण विभागीय आयुक्त देशमुख यांच्या संकल्पनेतून सदर मोहिम आखण्यात आली असून येत्या 7 जुलै पासून याची सुरुवात होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages