मुंबई १२ जुलै २०१६ - लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, कॉलरा आदी पावसाळ्यात उद्भवणाऱया रोगांवर पालिका प्रशासन प्रभावी उपाययोजना करीत असून पालिका प्रशासनास सहाय्य व्हावे म्हणून शिवसेनेचे गटप्रमुख, शाखाप्रमुख, नगरसेवक तसेच पदाधिकारी आणि अशासकीय संस्था, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक येत्या आठ दिवसांत घेण्यात येणार असल्याचे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या रोगांबाबत महापौर निवास येथे आज (दिनांक १२ जुलै, २०१६) रात्री आयोजित केलेल्या पदाधिकारी व पालिका अधिकारी यांच्या आढावा बैठकीत संबोधित करताना दिले.
या बैठकीस संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले की, पावसाळ्यात उद्भवणाऱया रोग तसेच इतर वैद्यकीय आरोग्य सेवा – सुविधा विषयकची आढावा बैठक दर महिन्याला आयोजित करावी, त्यामुळे हाती घेण्यात आलेल्या वैद्यकीय प्रकल्प व सेवा – सुविधांबाबत आढावा घेणे सुलभ होईल. ते पुढे म्हणाले की, पालिकेबरोबरच खासगी सहकारी गृहनिर्माण संस्था, राष्ट्रीय वस्त्रोद्योग संस्था व इतरांचे अश्या रोगांवर प्रभावी उपाययोजना अंमलात आणावेत म्हणून त्यांचे सहकार्य घ्यावे.
महापालिका करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती सर्वसामान्य मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी जनप्रबोधन मोहीम आयोजित करावी, तसेच या कामी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचेही सहकार्य घ्यावे, असेही त्यांनी सांगितले. व्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातून अश्या रोगांवर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे नागरिकांपर्यंत संदेश पोहोचता येईल. तरी आठवड्यातून एक तास अश्या रोगांबाबतचे प्रबोधन विद्यार्थ्यांना करावे, म्हणजे ते आपल्या घराबरोबरच परिसरातही चांगल्या प्रकारे लोकप्रबोधन करु शकतात. तसेच ज्या प्रकारे पोलिओ निर्मुलन करण्याकामी आरोग्य सेविकांनी जी उत्कृष्ट भूमिका बजावली, त्याच धर्तीवर लेप्टो, डेंग्यू सारख्या रोगांबाबतही नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम करुन घेता येईल का, याची पडताळणी पालिका प्रशासनाने करावी, असे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी दिले.
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राज्य शासनातर्फे करण्यात येणाऱया उपाययोजना व प्रभावी अंमलबजावणी यांबाबत सविस्तर माहिती देऊन लेप्टो, डेंग्यू रोगांवर प्रभावीपणे उपाययोजना करता याव्यात, यासाठी राज्य शासन सहकार्य करेल, असे नमूद केले.
याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती कुंदन यांनी याबाबत यंदाच्या पावसाळ्यात ज्या उपाययोजना अंमलात आणावयाच्या आहेत, त्यांची सविस्तर माहिती देऊन त्याचे संगणकीय सादरीकरणही सादर केले.तसेच गत वर्षीपेक्षा लेप्टो, डेंग्यू या दोन्ही आजारांच्या रुग्णांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले. सर्व त्या उपाययोजना यंदाच्या पावसाळ्यात प्रभावीपणे राबविण्यात येतील, असे आश्वस्त केले.
याप्रसंगी याअनुषंगाने झालेल्या चर्चेत महापौर स्नेहल आंबेकर, आमदार सुनील प्रभू, सभागृह नेता तृष्णा विश्वासराव, स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे, सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनीही आपापले विचार तसेच करावयाची कार्यवाही पालिका अधिकाऱयांसमोर विशद केली.
समारोप करताना महापौर स्नेहल आंबेकर यांनी प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्या उत्तम सहकार्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात उद्भवणाऱया रोगांवर मात होत असून असेच सहकार्य यापुढेही सुरु ठेवून या रोगांवर प्रभावीपणे मात करु या, असे सांगून सर्व माध्यमांद्वारे याबाबतचे लोकप्रबोधन चांगल्या प्रकारे होणे गरजेचे असल्याचेही प्रतिपादन त्यांनी शेवटी केले.
No comments:
Post a Comment