जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी 25 नोव्हेंबरला अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी 25 नोव्हेंबरला अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार

Share This
मुंबई, दि. 20 Aug 2016 राज्य निवडणूक आयोगाने 26 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 297 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घोषित केला असून 25 नोव्हेंबर 2016 रोजी अंतिम प्रभाग रचना व आरक्षण जाहीर केले जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.


सहारिया यांनी सांगितले की, या सर्व जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची मुदत मार्च 2016 पूर्वी मुदत संपत आहे. तत्पूर्वी त्यांच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातील. त्यासाठी सन 2011 च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी 9 सप्टेंबर 2016 पर्यंत जिल्हा परिषद क्षेत्राची निवडणूक विभागांमध्येतर पंचायत समिती क्षेत्राची निर्वाचक गणांमध्ये विभागणी म्हणजे प्रभाग रचना करतील व त्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर करतील. या प्रस्तावात अनुसूचित जाती व जमातींच्या आरक्षणाचाही समावेश असेल. विभागीय आयुक्त त्यास 23 सप्टेंबर 2016 पर्यंत मान्यता देतील. 5 ऑक्टोबर 2016 रोजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला आरक्षणाबाबतची जिल्हा परिषद निवडणूक विभागांसाठीची सोडत जिल्हाधिकारीतर पंचायत समिती निर्वाचक गणांसाठीची सोडत तहसीलदारांच्या उपस्थितीत काढण्यात येईल.

निवडणूक विभाग व निर्वाचक गणतसेच आरक्षणाबाबतचे प्रारूप 10 ऑक्टोबर 2016 रोजी प्रसिद्ध केले जाईल. त्यावर नागरिकांना 10 ते 20 ऑक्टोबर 2016 या कालावधीत संबंधित जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे हरकती व सूचना दाखल करता येतील. प्राप्त हरकती व सूचनांवर संबंधित विभागीय आयुक्त सुनावणी देतील. त्यानंतर ते 17 नोव्हेंबर 2016 पर्यंत निवडणूक विभाग व निर्वाचक गणांची रचना अंतिम करतील. त्यास 25 नोव्हेंबर 2016 रोजी शासन राजपत्रात प्रसिद्धी दिली जाईल, असेही सहारिया यांनी सांगितले. 

जिल्हा परिषदनिहाय सदस्य संख्या (जिल्हा परिषदेचा प्रत्येक निवडणूक विभाग पंचायत समितीच्या दोन निर्वाचक गणांमध्ये विभागण्यात येईल): रायगड- 61, रत्नागिरी- 55, सिंधुदुर्ग- 50, नाशिक- 73, जळगाव- 67, अहमदनगर- 73, पुणे- 75, सातारा- 64, सांगली- 60, सोलापूर- 68, कोल्हापूर- 67, औरंगाबाद-62, जालना- 56, परभणी- 54, हिंगोली- 52, बीड- 60, नांदेड- 64, उस्मानाबाद- 55, लातूर- 58, अमरावती- 59, बुलढाणा- 60, यवतमाळ- 61, नागपूर- 58, वर्धा- 52,चंद्रपूर- 56 आणि गडचिरोली- 51.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages