ओबीसी आरक्षणासाठी ३१ ऑगस्टला आझाद मैदानात मोर्चा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ओबीसी आरक्षणासाठी ३१ ऑगस्टला आझाद मैदानात मोर्चा

Share This
मुंबई / प्रतिनिधी - ओबीसी आरक्षणाची तीन भागांत विभागणी करावी, या प्रमुख मागणीकरिता ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता विमुक्त दिनी बारा बलुतेदारांचा व भटक्या-विमुक्तांचा आझाद मैदान, मुंबई येथे मोर्चा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. ओबीसी चळवळीचे राष्ट्रीय नेते हरिभाऊ राठोड, बारा बलुतेदार महासंघाचे कल्याणराव दळे, समाजसुधारक किसनराव राठोड, कडोंमपाचे माजी आयुक्त गोविंद राठोड यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला जाणार आहे. 

केंद्रातील ओबीसी आरक्षणाचा फायदा फक्त मोठय़ा मातब्बर समाजालाच होत आहे. ज्या समाजाला खर्‍या अर्थाने आरक्षणाची गरज आहे, असा समाज विकासापासून कोसोदूर राहिला आहे. त्यामुळेच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने २ मार्च २0१५ ला केंद्रातील ओबीसी आरक्षणाची ३ भागांत विभागणी करा, अशी स्पष्ट शिफारस केली आहे. या शिफारसीची अंमलबजावणी करताना भटके विमुक्त : बंजारा, धनगर, वंजारा, बेलदार, भराडी, भुते, गारुडी, लोहार, गोंधळी, काशीकापडी, कोल्हाटी, मसनजोगी, नंदीवाले, वैदू, वासुदेव, कैकाडी, वडार, रामोशी, वाघरी, बेरड इत्यादींचा पहिला गट; बारा बलुतेदार : कोळी, माळी, तेली, लोहार, सुतार, सोनार, न्हावी, धोबी, शिंपी यांचा दुसरा आणि अतिमागासांचा तिसरा गट अशा पद्धतीने ९-९ टक्क्यांनी हे आरक्षण विभागले जावे; जेणेकरून हा समाज मुख्य प्रवाहात येईल अशी मागणी करण्यात येणार असल्याचे हरिभाऊ राठोड यांनी सांगितले. 

याव्यतिरिक्त राज्यातील भटक्या विमुक्त समाजाला क्रिमिलेअरच्या जाचक अटीमधून वगळणे, बंजारा समाजाच्या तांड्याला रेवणी दर्जा व वेगळी ग्राम पंचायत, बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करणे, बारा बलुतेदारांना महाराष्ट्रात भटके विमुक्तांप्रमाणे वेगळे आरक्षण द्या. या समाजासाठी वेगळे वसतिगृह निर्माण करा, गुरव समाजाचे जमिनीचे प्रकरण त्वरित निर्णय घेऊन त्याच्या नावे करा, बंजारा समाजाच्या काशी पोहरादेवीचा सर्वांगीण विकास करावा, शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यावी, भटक्या विमुक्त व बारा बलुतेदारांना जातीचे दाखले घरपोच द्यावेत आदी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहेत, असेही हरिभाऊ राठोड यांनी सांगितले. 

दरम्यान, बंजारा समाजाची जागतिक परिषद दिल्ली येथे २७ ऑगस्ट सायंकाळी ६ वाजता व २८ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजता दरबार हॉल, रकाबगंज गुरुद्वारा, नवी दिल्ली येथे बाबा लखिशा बंजारा आणि मखन शाह लबाना सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त आयोजन केले आहे. या परिषदेसही भटक्या विमुक्त समाजाने उपस्थित राहण्याचे आवाहनही हरिभाऊ राठोड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages