मुंबई / प्रतिनिधी : शीव आणि कूपर या दोन्ही रुग्णालयांमध्ये पूर्णवेळ अधिष्ठाता नसल्याने वैद्यकीय सेवेबाबतचे निर्णय सध्या घेतले जात नाहीत. त्यामुळे या दोन्ही रुग्णालयांची आरोग्यसेवा जणू 'व्हेंटिलेटर'वर असल्याची चर्चा वैद्यकीय क्षेत्रात सुरू आहे. त्याचे पडसाद शुक्रवारी पालिका आरोग्य समितीत उमटले. या दोन्ही रुग्णालयात पूर्णवेळ अधिष्ठाता का दिलेला नाही. त्यात काही अडचणी आहेत का, असे प्रश्न सदस्यांनी आरोग्य विभागाला विचारून पूर्णवेळ डीन देण्याची मागणी केली. पालिकेच्या रुग्णालयात अधिष्ठाता पदासाठी एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण का भरलेले नाही, असा प्रश्न विष्णू गायकवाड यांनी केला.
नगरसेवक विष्णू गायकवाड यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे प्रशासनाला धारेवर धरले. शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनीही त्यांना पाठिंबा दिला. डॉ. सुलेमान र्मचंट यांना शीव रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता पदाचा कार्यभार दिला असताना त्यांच्याकडे कूपरचाही भार दिला आहे. शीव येथून अंधेरीला जाऊन त्याही रुग्णालयाचा कारभार र्मचंट कसे सांभाळतात, असा प्रश्न म्हात्रे यांनी केला. नगरसेवकांनी फोन केल्यावर डॉ. र्मचंट त्याला प्रतिसाद देत नाहीत, मग कूपर रुग्णालयाला ते कसा न्याय देतील, असे शिवसेनेच्या डॉ. अनुराधा पेडणेकर म्हणाल्या. किमान पावसाळ्यात या रुग्णालयाला पूर्णवेळ अधिष्ठाता देण्याची आवश्यकता होती, अशी मागणी माजी महापौर डॉ. शुभा राऊळ आणि प्रमिला शिंदे यांनी या सभेत केली. उद्या या रुग्णालयात आरोग्याचा प्रश्न उद्भवल्यास प्रशासन त्याची जबाबदारी घेणार का, अशीही विचारणा त्यांनी केली. पालिकेच्या १६ उपनगरीय रुग्णालयांचे अधीक्षक डॉ. महेंद्र वाडीवाला तुरुंगात असून ते तुरुंगातून कामकाज करणार आहेत का, त्यांच्याकडून हे काम का काढून घेतले नाही, उपनगरीय रुग्णालयांसाठी अद्यापि अन्य अधीक्षक का नियुक्त केला नाही, अशी विचारणा म्हात्रे यांनी केली. 'वाडीवाला यांना सेवेतून काढण्याचे कोणतेही आदेश आयुक्तांनी दिले नसल्याने नवीन अधीक्षकाची नियुक्ती केली नसल्याचे प्रशासनाने सांगितले.
No comments:
Post a Comment